पूर्व आणि ईशान्य भारताचा परिसर सोमवारी पहाटे भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. इंफाळपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तमाँग जिल्ह्यात या भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदविला गेला आहे. दरम्यान, थोड्याचवेळापूर्वी म्हणजे ९.२७ वाजता मणिपूरला दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.  या भूकंपामुळे इम्फाळमध्ये मोठ्याप्रमाणावर इमारती कोसळल्या आहेत.  यामध्ये आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत, तर पश्चिम बंगालमधील सिलिगुडीमध्येही अनेक जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) दोन पथके मदतकार्यासाठी गुवाहाटीवरून इम्फाळला रवाना झाली आहेत. याशिवाय, सकाळी १०.३० वाजता भूकंपाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आज पहाटे ४.३७ वाजण्याच्या सुमारास मणिपूर, आसाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोरम आणि त्रिपुरासह ईशान्य आणि पूर्व भारताच्या अनेक भागांमध्ये हे धक्के जाणवले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करून त्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ईशान्य भारताचा परिसर जगातील सहाव्या क्रमांकाचे भूकंपप्रवण क्षेत्र मानले जाते. गुवाहाटीमध्ये साधारण एका मिनिटात दोनवेळा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे येथील नागरिक घाबरून रस्त्यावर आले. तर इम्फाळमध्ये साधारण मिनीटभर जमीन हादरत होती. त्यामुळे अनेकांच्या घरातील सामानाची पडझड झाली आहे. सध्या येथील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. याशिवाय, पश्चिम बंगाल, आसाम, अरूणाचल, नेपाळ, बांगलादेश, झारखंड, बिहारमध्येही हे धक्के जाणवले आहेत.