एपी, अझमरिन (सीरिया) : पश्चिम आशियात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरिया या देशांमध्ये किमान दोन हजार ६०० नागरिकांचा बळी गेला आहे. भल्या पहाटे ७.८ तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे लेबेनॉन, इस्रायलपर्यंत जाणवले. भूकंपामध्ये हजारो नागरिक जखमी झाले आहेत. अद्याप अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
आखातामध्ये झालेल्या या भूकंपाचे क्षेत्र मोठे असल्याने तुर्कस्तान आणि सीरियाच्या शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात घरे आणि इमारतींची पडझड झाली आहे. सीरियाच्या अलेप्पो आणि हमा शहरांपासून तुर्कस्तानच्या दियारबाकीपर्यंत, ईशान्य भागातील ३३० किलोमीटरहून अधिक विस्तीर्ण भागात अनेक इमारती कोसळल्याच्या बातम्या आहेत. दोन्ही देशांतील नागरिक भल्या पहाटे निद्राधीन असताना, हा भूकंप झाला. एकीकडे हिमप्रपात, पाऊस व बोचऱ्या थंडीने कहर केला असतानाच कोसळलेल्या या नैसर्गिक संकटाने नागरिकांचे आणखी हाल झाले आहेत. पहिल्या मोठय़ा भूकंपानंतरही अनेक धक्के (आफ्टरशॉक) बसले. यातील काहींची तीव्रता पहिल्या भूकंपाइतकीच होती.
धोक्याची टांगती तलवार!
हा प्रदेश भूकंपप्रवण भूस्तरांच्या मोठय़ा प्रभंग रेषांच्या वर (फॉल्ट लाइन्स) वसलेला आहे. त्यामुळे येथे वारंवार भूकंप होत असतात. तुर्कस्तानात १९९९ मध्ये झालेल्या अशाच शक्तिशाली भूकंपात १८ हजार मृत्युमुखी पडले होते. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारचा भूकंप ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. त्यानंतर किमान २० भूकंपोत्तर धक्के (आफ्टरशॉक) बसले. त्यापैकी एक ७.५ तीव्रतेचा होता.