भारत व अमेरिका या देशांची खरी गुंतवणूक ही द्विपक्षीय संबंधात आहे व ती अधिक दीर्घ होत जाईल. जागतिक परिणाम करणाऱ्या धोरणांच्या निर्मितीसाठी अधिक निकोप, सुरक्षित व भरभराटीचा भविष्यकाळ घडवला जाईल, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सांगितले.
केरी यांनी सांगितले, की संरक्षण, हवामान बदल, नागरी अणु सहकार्य व आर्थिक भागीदारी या क्षेत्रात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चेत भर दिला जाणार आहे.
सागरी सुरक्षा, दहशतवादाचा मुकाबला, तस्करी व सामूहिक नाशाच्या शस्त्रास्त्रांना प्रसारबंदी यात आम्ही काम करीत आहोत. राजकीय व सुरक्षा विषयांवर आमचा संवाद सुरूच राहील असे सांगून ते म्हणाले, की ओबामा हे भारताचे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे आहेत. अमेरिकी अध्यक्षांनी या कार्यक्रमाला येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
केरी यांनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात सांगितले, की अमरिकेचे व्यापारमंत्री पेनी प्रिटझकेर, संरक्षणमंत्री चक हॅगेल व माजी परराष्ट्र उपमंत्री बिल बर्न्‍स हे मोदी यांच्या राजवटीच्या १०० दिवसांच्या निमित्ताने येथे येत आहेत हा योगायोग नाही. भारताबरोबर काम करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. पॅरिस येथे हवामान करार होणार आहे, त्यातही भारताचे सहकार्य वाढले पाहिजे. ओबामा यांच्या चर्चेत हा विषय येईलच.
केरी यांच्या कारला किरकोळ अपघात
अहमदाबाद : जॉन केरी हे आपल्या कारमधून विमानतळाकडे जात असताना, त्यांच्या कारने ताफ्यातील अन्य मोटारीस धडक दिल्यामुळे किरकोळ अपघात झाला. मात्र त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ‘व्हायब्रण्ट गुजरात’ परिषदेत सहभागी होण्यासाठी केरी येथे आले होते. केरी यांची कार जात असताना रस्त्यावरून एक कुत्रा अचानक तेथे आडवा आल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी ताफ्यातील एका मोटारचालकाने आपत्कालीन ब्रेकचा वापर केला आणि हा किरकोळ अपघात घडला. या वेळी दोन्ही मोटारींचे नुकसान झाले. मात्र, त्यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.