युक्रेन-रशिया सीमेवर तणाव तीव्र, सैन्याची मोठय़ा प्रमाणावर जमवाजमव

Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
israel withdraws troops from southern gaza
दक्षिण गाझामधून इस्रायलचं सैन्य माघारी; नेमकं कारण काय?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
tiger unexpectedly came out of bushes jumped on cow
जंगल सफारीचा आनंद घेत होते पर्यटक, अचानक झुडपातून बाहेर आला वाघ, उडी मारून….पुढे काय घडले ते व्हिडीओमध्ये बघा

युक्रेनच्या पूर्व सीमेसमीप रशियाची दीड लाख सैन्यतैनाती, पूर्व युक्रेनमधील रशियासमर्थक फुटीरतावाद्यांनी सुरू केलेली सैन्य जमवाजमव, डोनेत्स्क प्रांतातील नागरिकांचे रशियाकडे सुरू केलेले स्थलांतर आणि रशियाने केलेली अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची चाचणी यामुळे संपूर्ण जगावरच युद्धाचे ढग घोंघावू लागले आहेत.

पूर्व युक्रेनमधील रशिया-समर्थक फुटीरतावादी नेत्यांनी शनिवारी संपूर्ण लष्करी जमवाजमव करण्याचे आदेश दिल्याने पाश्चात्य नेत्यांनी रशियाच्या युक्रेनवरील संभाव्य आक्रमणाबद्दल गंभीर इशारा दिला. अमेरिकेनेही जगावर दाटलेल्या या युद्धछायेची दखल घेतली असून रशियाने युक्रेनवर हल्ला केलाच तर आम्ही त्याच्या वित्तीय संस्था आणि प्रमुख उद्योगांना लक्ष्य करू, असा इशारा दिला आहे.

युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाची तीव्रता शनिवारी आणखी वाढली. त्यात पूर्व युक्रेनमध्ये शनिवारी सकाळी रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यात युक्रेनचा एक सैनिक ठार झाला आणि या तणावात तेल ओतले गेले. या पार्श्वभूमीवर पूर्व युक्रेनमधील फुटीरतावादी नेत्यांनी युद्धग्रस्त भागात हिंसाचार वाढत असताना तेथे सैन्याची जमवाजमव करण्याचे आदेश दिले आहेत. तर रशियाने आता सुमारे दीड लाख सैन्य युक्रेनच्या पूर्वसीमेवर तैनात केले आहे.

पूर्व युक्रेनच्या डोनेत्स्क प्रांतातील रशिया समर्थक फुटीरतावादी सरकारचे प्रमुख डेनिस पुशिलीन यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात सर्व सैन्याची जमवाजमव करण्याच्या घोषणेबरोबरच राखीव सैन्यालाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुशिलिन यांनी, युक्रेनचे सैन्य पूर्व युक्रेनवर कधीही आक्रमण करू शकते, असा इशारा दिला आहे. पूर्व युक्रेनमधील सर्व पुरुष आपल्या

कुटुंबांचे, मुलांचे, पत्नीचे, मातांचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रे बाळगू शकतात, असे आवाहनही पुशिलीन यांनी केले आहे. पुशिलीन यांच्या घोषणेनंतर लगोलग लुहान्स्क प्रांतातील फुटीरतावादी नेते लिओनिद पॅसेशनिक यांनीही सैन्याची जमवाजमव करण्याची घोषणा केली.

युक्रेनचे लष्कर आणि फुटीरतावाद्यांचे सैन्य यांच्यात जवळपास आठ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. परंतु पश्चिम आणि पूर्व युक्रेन यांच्यातील संपर्क रेषेवरील हिंसाचारात अलीकडच्या काही दिवसांत वाढ झाली आहे.

रशियाची क्षेपणास्त्र चाचणी

युक्रेन सीमेवरील तणाव कमालीचा वाढत असताना रशियाने शनिवारी नियोजित सामरिक आण्विक सरावांचा एक भाग म्हणून आपल्या नव्या हायपरसॉनिक, क्रूझ आणि अण्वस्त्रसज्ज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि बेलारूसचे अध्यक्ष अ‍ॅलेक्झांडर ल्युकाशेन्को यांच्या देखरेखीखाली हा सराव करण्यात आला. 

‘‘सर्व क्षेपणास्त्रांनी समुद्रातील आणि जमिनीवरील आपल्या लक्ष्यांवर अचूक मारा केला. या कवायतींमध्ये ‘टीयू-९५ बॉम्बर’ आणि पाणबुडय़ांचा समावेश होता’’, अशी माहिती रशियन लष्कराने दिली. आमच्या परिपूर्ण लष्करी सामर्थ्यांची प्रचीती शत्रूला देणे हा या सरावामागील मुख्य हेतू होता, असे रशियाचे चीफ ऑफ द जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, डोनेत्स्क प्रांतातील भागात शनिवारी गोळीबारात एका सैनिकाचा मृत्यू झाला, तर फुटीरतावाद्यांच्या सैन्याने चिथावणी देण्यासाठी निवासी भागात तोफांचा मारा केला. तर फुटीरतावद्यांनी शुक्रवारी युक्रेन आक्रमणाच्या तयारीत असल्याचा दावा करीत आपल्या ताब्यातील भागांतून शेकडो नागरिकांना रशियाकडे हलवण्यास सुरुवात केली आहे. महिला, मुले आणि वृद्धांना प्रथम बाहेर काढले जाईल, त्यांच्यासाठी रशियाने सर्व सुविधा तयार ठेवल्या आहेत, असे डोनेत्स्कमधील फुटीरतावादी सरकारचे प्रमुख पुशिलिन यांनी शुक्रवारी म्हटले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की डोनेत्स्कवर हल्ल्याचा आदेश देणार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. अर्थात तो युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी फेटाळला होता.

अमेरिकेची भूमिका

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी उशिरा युक्रेन सीमेवरील तणावावर भाष्य केले. ते म्हणाले, की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आणि राजधानी कीववर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याची खात्री आता मला झाली आहे. अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सीमेवर रशियाने तैनात केलेल्या सैन्यापैकी अंदाजे ४० ते ५० टक्के भूदल हल्ल्याच्या तयारीत आहे.

युरोपला धास्ती..

’काही दिवसांतच युद्धाला तोड फुटेल या भीतीने, युक्रेन सोडण्याच्या जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या आपल्या नागरिकांना सूचना.

’जर्मन हवाई वाहतूक कंपनी ‘लुफ्थान्सा’ची युक्रेनची राजधानी कीव आणि ओडेसा, तसेच काळय़ा समुद्रातील बंदरावरून होणारी विमान उड्डाणे रद्द. 

’ब्रुसेल्स आणि पश्चिम युक्रेनमधील सिटी ऑफ ल्विव्ह येथील कर्मचाऱ्यांना स्थलांतरित करण्यात येत असल्याची कीवमधील ‘नाटो’ देशांच्या संपर्क कार्यालयाची माहिती.

अमेरिकेचा इशारा..

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी शनिवारी म्युनिक सुरक्षा परिषदेत, ‘‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास अभूतपूर्व आर्थिक नुकसान सहन करावे लागेल’’, असा इशारा दिला. त्या म्हणाल्या की रशियाची उक्ती आणि कृती यांत फरक आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केलाच तर आम्ही रशियाच्या वित्तीय संस्था आणि प्रमुख उद्योगांना लक्ष्य करू.

नागरिकांचे स्थलांतर

’शनिवार सकाळपर्यंत बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागातील सहा हजारांहून अधिक रहिवाशांना रशियाला हलवण्यात आल्याची माहिती डोनेत्स्क प्रदेशातील फुटीरतावाद्यांनी जाहीर केली.

’फुटीरतावादी नेत्यांनी शुक्रवारी

लाखो लोकांना पूर्व युक्रेनबाहेर काढण्याचे जाहीर केले होते. रशियाने बंडखोरनियंत्रित प्रांतातील सुमारे सात लाख रहिवाशांना पारपत्र जारी केल्याचे वृत्त आहे.