काही आफ्रिकी देशांमध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने दक्षतेची पावले उचलली आहेत. इबोलाग्रस्त देशांमधून येणार्या किंवा त्या देशांमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना जारी केल्या आहेत. देशातील विमानतळांवर अतिदक्षता जारी करून लक्षणे दिसणार्या प्रवाशांना इमिग्रेशन तपासणीपूर्वी विमानतळावरील आरोग्य अधिकार्यांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या देशांना ‘उच्च-जोखीम असलेले देश’ म्हणून वर्गीकृत केले आहे. या देशांमध्ये सार्वजिनक आरोग्याला गंभीर धोका असल्याचा इशारा देण्यात आला असून केंद्र सरकारने खबरदारी म्हणून कठोर उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे.
आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या तीनही देशांमधून येणार्या प्रवाशांसाठी या सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी बुधवारी इबोलासाठीची तयारी आणि प्रतिसाद उपाययोजनांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांबरोबर एका उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.
भारतात आतापर्यंत इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले. भारत-आफ्रिका संघ शिखर परिषद स्थगित इबोला विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत २८ ते ३१ मेदरम्यान होणारी भारत-आफ्रिका संघ शिखर परिषद स्थगित करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आफ्रिकी राष्ट्रांशी सल्लामसलत करून शिखर परिषदेच्या नवीन तारखा लवकरच निश्चित केल्या जातील.
सूचना काय?
- ’ प्रवाशांना ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायूदुखी, उलट्या, जुलाब, घसा खवखवणे, अनाकलनीय रक्तस्राव अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी काळजी घ्यावी आणि विमानतळावरील आरोग्य अधिकार्यांशी संपर्क साधावा.
- ’ ज्या प्रवाशांचा संशियत किंवा निश्चित इबोला रुग्णाच्या रक्ताशी किंवा शारीरिक द्रवांशी थेट संपर्क आला आहे, त्यांनी तात्काळ विमानतळावरील आरोग्य कक्षाला कळवावे.
- ’ देशात आगमन झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत लक्षणे दिसू लागल्यास प्रवाशाने तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी आणि डॉक्टरांना केलेल्या प्रवासाची माहिती द्यावी.
