पीटीआय, अबुजा (नायजेरिया)

काँगो आणि शेजारील युगांडातील इाबोलाचा उद्रेक हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय असल्याचे नमूद करत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी रविवारी ही घोषणा केली.

‘डब्ल्यूएचओ’च्या माहितीनुसार, या उद्रेकात आतापर्यंत ३०० हून अधिक संशयित रुग्ण आढळले असून ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा उद्रेक करोना महासाथीसारखा नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची गरज नाही. काँगोची राजधानी किंशासा येथेही एक रुग्ण आढळला. हा रुग्ण इटुरी भागात जाऊन आला आहे. परिणामी संसर्ग इतर भागांत पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय उत्तर किवू प्रांतातही काही संशयित रुग्ण आढळले आहेत.

इबोला हा संसर्गजन्य रोग असून तो रक्त, उलटीद्वारे पसरतो. हा आजार अनेकदा जीवघेणा ठरू शकतो. सध्या सुरू असलेला उद्रेक ‘बुंडिबुग्यो’ या दुर्मिळ प्रकारच्या विषाणूमुळे होत असून यासाठी अद्याप मान्यताप्राप्त औषध किंवा लस उपलब्ध नाही. या प्रकारचा इबोला यापूर्वी २००७-०८ मध्ये युगांडामध्ये आढळला. त्यावेळी १४९ जणांना संसर्ग होऊन ३७ जणांचा मृत्यू झाला होता. २०१२मध्ये काँगोच्या इसिरो येथील साथीत २९ मृत्यूंची नोंद झाली होती.

दरम्यान, ‘आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेनशन’चे प्रमुख जीन कासेया यांनी सांगितले की, अनेक रुग्ण समुदायात राहत असल्याने संसर्ग रोखणे अवघड जात आहे. काँगोमधील संघर्ष, दहशतवादी कारवाया आणि सतत होणारे स्थलांतर यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, या उद्रेकाची सुरुवात एप्रिलमध्ये झाली असावी. मात्र सुरुवातीला तो लक्षात न आल्याने संसर्ग वेगाने पसरला.