इबोला साथीबाबत टेहेळणी, रुग्णालयांची सुसज्जता आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी यासारख्या उपाययोजना वाढवण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. काँगो आणि युगांडा या दोन देशांमध्ये इबोलाच्या साथीनंतर जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यासंबंधी खबरदारीचे निर्देश दिले.

केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी २१ मे रोजी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांना यासंबंधी पत्र लिहिले. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) आणि युगांडा या देशांसह, दक्षिण सुदानसह लागून असलेल्या देशांमध्ये इबोलाचे संक्रमण होण्याचा धोका अत्याधिक असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

‘‘सध्याच्या मूल्यांकनानुसार, प्रभावित क्षेत्राबाहेरील (काँगो आणि युगांडा) इबोलाचा धोका कमी असल्याचे सूचित होते. पण आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवास यामुळे पुरेशी सुसज्जता राखणे आणि आरोग्य व्यवस्थेच्या सर्व स्तरांवर प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे आवश्यक आहे,’’ असे आरोग्य सचिवांनी लिहिले आहे. संशयित इबोला रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी पुण्याची राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था सुसज्ज आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

विशेषत: अलीकडेच प्रभावित क्षेत्रांमध्ये प्रवास केलेल्या लोकांमध्ये, असामान्य प्रमाणात इबोलाची लक्षणे दिसून आल्यास ती ओळखण्यासाठी एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रमाअंतर्गत देखरेख मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे. या लक्षणांमध्ये ताप, अशक्तपणा, स्नायूंची वेदना, डोकेदुखी, घसा खवखवणे, उलट्या, अतिसार, पोटदुखी, पुरळ आणि डोळे लाल होणे यांचा समावेश आहे. इबोलासाठी निर्देशित विलगीकरण सुविधा, समर्पित रुग्णवाहिका, प्रशिक्षित आरोग्य सेवकांची उपलब्धता, वैयक्तिक संरक्षण उकरणे, लॉजिस्टिक्स, प्रयोगशाळांचे सहाय्य आणि महत्त्वाच्या आरोग्यसेवा क्षमता सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.