केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनाची (Special Summary Revision) घोषणा करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार याद्या २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. SIR वरून विरोधक आक्रमक झाले असतानाच ही घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. SIR प्रक्रियेत नावं वगळली गेल्याचा मुद्दा देशभरात चर्चेत आहे. यावरून राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचंही आंदोलन सुरू आहे, दरम्यान हे आंदोलन शांत झालं नसलं तरीही आता निवडणूक आयोगाने SSR म्हणजेच विशेष संक्षिप्त पुनरावलोकन प्रकियेची सुरूवात केली आहे.

SSR मध्ये काय होणार?

SSR म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरावलोकन प्रक्रियेत सध्याच्या मतदार याद्यांमध्ये नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे आणि अपात्र मतदारांची नावे वगळणे यासह आवश्यक बदल केले जातील. २०२५ मध्ये सुरू झालेली आणि अद्याप सुरू असलेली एसआयआर (विशेष सखोल पुनरीक्षण) प्रक्रिया ही मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया आहे.

सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून निवडणूक आयोगाने सांगितले की, २९ सप्टेंबर रोजी आयोगाने मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या व्यक्ती, तरुण आणि पहिल्यांदाच मतदानासाठी पात्र ठरलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, “१ जानेवारी २०२७ ही पात्रता तारीख गृहीत धरून पात्र मतदारांची नोंदणी सुलभ करण्यासाठी तसेच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२७ या पुढील तीन पात्रता तारखांसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्यासाठी विद्यमान मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (एसएसआर) करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात येत आहेत.” ही संपूर्ण प्रक्रिया लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम २१ अंतर्गत राबवण्यात येणार आहे.