scorecardresearch

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातून संजय राऊत ते प्रफुल पटेलांपर्यंत ‘या’ ६ जणांचा समावेश

राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झालीय.

राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झालीय. भारतीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं सविस्तर वेळापत्रक जारी केलं आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश आहे. यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा समावेश आहे.

निवडणूक होत असलेल्या ५७ राज्यसभा खासदारांची मुदत २१ जून ते १ ऑगस्ट या काळात संपत आहे. यात १५ राज्यांमधील खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ६ खासदारांची मुदत ४ जुलै २०२२ रोजी संपत आहे.

राज्यसभेतील मुदत संपत असलेले महाराष्ट्रातील ६ खासदार कोण?

१. पियुष गोयल
२. पी. चिदंबरम
३. प्रफुल पटेल
४. विकास महात्मे
५. संजय राऊत
६. विनय सहस्त्रबुद्धे

निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम

नोटिफिकेशन – २४ मे २०२२
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३१ मे २०२२
अर्जांची तपासणी – १ जून २०२२
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ३ जून २०२२
मतदानाचा दिवस – १० जून २०२२
मतदानाची वेळ – सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतदान मोजणी – १० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)
निवडणूक पूर्ण करण्याची अंतिम तारीख – १३ जून २०२२

राज्यसभेत भाजपाचं शतक ; कोणत्या पक्षाचं संख्याबळ काय?

दरम्यान, सहा राज्यांमधील १३ राज्यसभेच्या जागांसाठी मागील द्वैवार्षिक निवडणुकीत पंजाबमध्ये भाजपाला एक जागा गमवावी लागली. तथापि, भाजपाने तीन ईशान्येकडील राज्ये आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागा जिंकली, जिथे सर्व पाच सदस्य विरोधी पक्षांचे होते. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने पाचही जागा जिंकल्या आहेत.

राज्यसभेच्या वेबसाइटवर नवीन आकडेवारी अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या जागा जोडल्या गेल्यास, वरच्या सभागृहातील सदस्यांची संख्या १०० वर पोहोचेल. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे की, “भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आसाममधून राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या. ईशान्येतील अन्य दोन जागा, त्रिपुरा आणि नागालँड याही भाजपाने जिंकल्या आहेत. आतापर्यंत येथे ४/४ निकाल लागला आहे. भाजपाचे आता राज्यसभेत १०० सदस्य आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या दणदणीत विजयानंतर राज्यसभेतील पक्षाची ताकद सातत्याने वाढत आहे. २०१४ मध्ये राज्यसभेत भाजपाची संख्या ५५ होती आणि तेव्हापासून अनेक राज्यांमध्ये पक्षाने सत्ता मिळवल्यामुळे ही संख्या सातत्याने वाढत आहे.

राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ घटले त्यांचे २९ सदस्य आहेत. तर, तृणमूलचे-१३, डीएमके- १०, बीजेडी-९, आम आदमी पार्टी-८, टीआरएस-६, वायएसआरसीपी-६, एआयएडीएमके-५, राजद-५ आणि एसपी-५ सदस्य आहेत.

हेही वाचा : विश्लेषण : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही भाजप वरचढ, तर काँग्रेस अगतिक!

या अगोदर १९९० मध्ये असं झालं होतं, जेव्हा वरीष्ठ सभागृहात एखाद्या पक्षाच्या सदस्यांची संख्या १०० किंवा त्यापेक्षा जास्त होती. तेव्हा तत्कालीन सत्तारूढ पक्ष असलेल्या काँग्रेसचे १०८ सदस्य होते. १९९० च्या द्विवार्षिक निवडणुकीत राज्यसभेतील काँग्रेसच्या संख्येत घट होऊन ती ९९ झाली होती आणि तेव्हापासून ही संख्या कमी होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eci announce election program for rajya sabha 57 seats including sanjay raut pbs

ताज्या बातम्या