ECI Form 6 U-Turn SIR Declaration : निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठीच्या ऑनलाइन अर्जात केलेला एक महत्त्वाचा बदल अखेर मागे घेतला आहे. निवडणूक आयोगाने विशेष सखोल फेरतपासणी सुरू असलेल्या राज्यांमध्ये तेथील आपल्या ECINet पोर्टलवरून वैधानिक मतदार नोंदणी अर्ज, म्हणजेच फॉर्म ६ च्या ऑनलाइन आवृत्तीतून एसआरआय घोषणापत्र (SIR declaration) हटवलं आहे. विशेष म्हणजे, या बदलाला निवडणूक आयोगाचे दोन आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आधीच आक्षेप घेतला होता. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे.

फॉर्म ६ मधील घोषणापत्र हटवण्याची का मागणी झाली?

नवीन मतदारांना नोंदणीसाठी फॉर्म ६ भरावा लागतो. या ऑनलाइन अर्जात आयोगाने एसआरआय संदर्भातील एक अतिरिक्त घोषणापत्र समाविष्ट केलं होतं. या घोषणेनुसार, अर्जदाराला २००० साली झालेल्या एसआरआय मतदार यादीत स्वतःचे, आई-वडिलांचं किंवा आजी-आजोबांचं नाव होतं का, हे सांगणं बंधनकारक होतं. या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय अर्ज पुढे भरता येत नव्हता. मात्र, फॉर्म ६ मध्ये असा बदल करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती आवश्यक आहे, असा आक्षेप आयुक्त विवेक जोशी यांनी १६ मे रोजी नोंदवला. तर, संधू यांनी १३ ऑगस्ट रोजी हा बदल अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचं म्हटलं.

घोषणापत्र स्वतंत्र अर्जाच्या स्वरूपात उपलब्ध

जुलैमध्ये हा अतिरिक्त प्रश्न ऑनलाइन अर्जात समाविष्ट करण्यात आला. २३ सप्टेंबर रोजी हा मुद्दा समोर आल्यानंतर आयोगाने सुरुवातीला आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. २६ सप्टेंबर रोजी आयोगाने स्पष्ट केलं की, SIR सुरू असलेल्या राज्यांमध्ये ही घोषणा कायम राहील; इतर राज्यांमध्ये ती नसेल. १२ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुधारित फॉर्म ६ ला आपण मान्यता दिलेली किंवा नाकारलेली नसल्याचे स्पष्ट केलं. तर, अखेर २१ ऑक्टोबर रोजी आयोगाने हे घोषणापत्र फॉर्म ६ मधून पूर्णपणे वेगळं करण्याचा निर्णय घेतला. आता हे घोषणापत्र स्वतंत्र अर्जाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. सहा आठवड्यांत निवडणूक आयोगाने ‘फॉर्म ६’ बाबत घेतलेली ही तिसरी भूमिका असून, यामुळे आधीचा निर्णय पूर्णपणे बदलला आहे.

१० महिन्यांत १४ आक्षेप नोंदवले

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने २३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाचे आयुक्त संधू आणि जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या नावाने कोणतीही माहिती न देता घेतलेल्या निर्णयांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवले होते. या दोन्ही आयुक्तांनी नोंदवलेल्या आक्षेपांमध्ये आयोगाच्या कामकाजाशी थेट संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. मतदार म्हणून कोणाची नोंदणी करायची, कोणाचे नाव मतदार यादीतून वगळायचे किंवा पुन्हा समाविष्ट करायचे, मतदार यादीतून नाव वगळण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या अपीलांवर कोण निर्णय घेणार, तसंच सध्या मतदार याद्या तयार करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरचे नियंत्रण कोणाकडे असणार, अशा महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी आक्षेप घेतले होते.

आयोगाच्या अंतर्गत कामकाजावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. २८ जुलै रोजी काढण्यात आलेल्या एका प्रशासकीय आदेशाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील कामांचं वाटप बदलण्यात आलं होतं. यामध्ये माहिती-तंत्रज्ञान विभागाशी संबंधित फाइल्सचाही समावेश होता. मात्र, या निर्णयापूर्वी दोन्ही आयुक्तांशी कोणतीही चर्चा करण्यात आली नव्हती. या प्रकरणी दोघांनी स्वतंत्रपणे कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोघांनी संयुक्तपणे हा आदेश रद्द केला.

नोंदवलेले आक्षेप म्हणजे ‘सूचना’ आणि ‘अभिप्राय’

या १४ आक्षेपांपैकी पाच आक्षेपांच्या प्रती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाही पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून कोणतंही उत्तर देण्यात आल्याची नोंद उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, मे ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत पूर्ण निवडणूक आयोगाची एकदाही बैठक झाली नव्हती. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना संबंधित नोंदी या केवळ ‘सूचना’ आणि ‘अभिप्राय’ असल्याचं म्हटलं होतं. आयोगाच्या नियमित विचारविनिमय प्रक्रियेचाच त्या एक भाग असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरातील महत्त्वाचे निर्णय पूर्ण आयोगाच्या एकमताने मंजूर करण्यात आल्याचा दावाही आयोगाने केला होता. मात्र, त्यानंतरच्या पाच आठवड्यांत निवडणूक आयोगाने या दोन्ही आयुक्तांनी उपस्थित केलेल्या जवळपास सर्वच मुद्द्यांवर पावले उचलली आहेत.