प्रशांत महासागराच्या किनारपट्टीवरील लॅटिन अमेरिकेतील देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इक्वेडोरला शनिवारी रात्री भूकंपाचा जोरदार धक्का बसला. ७.८ रिश्टर स्केलच्या या भूकंपाच्या धक्क्यात ७७ जण ठार झाले तर शेकडो जण जखमी झाले. भूकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की, अनेक इमारतींची पडझड झाली. भूकंपाच्या धक्क्यानंतर तब्बल ५५ उपधक्के जाणवले.

सध्या तरी मृतांचा निश्चित आकडा ७७ असून ५८८ जण जखमी झाले आहेत असे सांगण्यात आले. काल उशिरा इक्वेडोर, उत्तर पेरू व दक्षिण कोलंबियाला भूकंपाचे धक्के बसले. इक्वेडोरमध्ये सहा प्रांतांत मोठी पडझड झाली असून तेथे आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. दशकातील हा मोठा भूकंप असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे इक्वेडोरचे उपाध्यक्ष जॉर्ज ग्लॅस यांनी स्पष्ट केले. क्विटो शहरापासून वायव्येला रात्री ११.५८ वाजता हा भूकंप झाला असून त्याचे धक्के काही मिनिटे इक्वेडोर, उत्तर पेरू व दक्षिण कोलंबियात जाणवले आहेत. क्विटो येथील रहिवासी मारिया टॉरेस (६०) यांनी सांगितले की, माझ्या आयुष्यात अनुभवलेला हा सर्वात मोठा भूकंप होता. मी चालू शकत नाही तरी मला भूकंपामुळे रस्त्यावर जावे असे वाटले, पण जमले मात्र नाही. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे दूरचित्रवाणीवरील बातम्यांत सांगण्यात आले.

इक्वेडोरचे उपाध्यक्ष ग्लॅस यांनी भूकंपाची तीव्रता ७.६ असल्याचे सांगितले. इ.स. १९०० पासून इक्वेडोरमध्ये सात भूकंप झाले असून मार्च १९८७ मध्ये १००० लोक ठार झाले होते. हवाई येथील पॅसिफिक सुनामी संस्थेने आधी सुनामी लाटांचा इशारा दिला होता, पण नंतर तो मागे घेण्यात आला.