नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’) या आर्थिक वर्षात आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित ५०० आरोपपत्र दाखल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, गुन्हा नोंदवल्यानंतर एक ते दोन वर्षांमध्ये तपास पूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी असे निर्देश तपास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती ‘ईडी’ने रविवारी दिली. यामध्ये गुंतागुंतीच्या प्रकरणांचा अपवाद करण्यात आला आहे.

गुवाहाटी येते गेल्या वर्षी १९ ते २१ डिसेंबरदरम्यान ‘ईडी’च्या विभागीय अधिकाऱ्यांची ३४वी त्रैमासिक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये यासंबंधी उपाययोजनांवर चर्चा झाली आणि त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले असे ‘ईडी’कडून सांगण्यात आले. गुवाहाटी बैठकीचे अध्यक्षपद ‘ईडी’चे संचालक राहुल नवीन यांनी भूषविले होते. त्यामध्ये अधिकाऱ्यांना लक्ष्य साध्य करण्याच्या, तपास तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्याच्या, खटल्याच्या तक्रारी वेळेत दाखल करण्याच्या आणि आकारलेले दंड कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आणि प्रभावीपणे वसूल होणारे असतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.