आर्थिक संकटात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) शनिवारी रात्री अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कपूर यांची तब्बल ३० तास चौकशी केली. त्यानंतर मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) केल्याच्या आरोपात त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

येस बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर ईडीनं शुक्रवारी रात्री बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर राणा कपूर यांना चौकशी ईडीनं ताब्यात घेतलं. शनिवारी दिवसभर यंत्रणांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर शनिवारी मध्यरात्री कपूर यांना अटक करण्यात आली. कपूर यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली असून, आज सकाळी ११ वाजता कपूर यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

ईडीच्या बॅलॉर्ड पीअर येथील प्रादेशिक कार्यालयात कपूर यांची चौकशी करण्यात आली. यावेळी ६०० कोटी रूपयांच्या कर्जप्रकरणी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आलं होतं. त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बँकेचे ३ हजार कोटींच कर्ज होतं. राणा कपूर येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या होत्या.

आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेने आर्थिकदृष्टय़ा सक्षम पुर्नउभारी घेण्याबाबतचा विश्वासार्ह आराखडा सादर न केल्याने बँकेविरुद्ध आरबीआयने कारवाई केली होती. या कारवाईमुळे अर्थविश्वात खळबळ उडाली. सरकारच्या मंजुरीनंतर येस बँकेवर प्रशासकही नियुक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँकेतील संशयित घोटाळ्याचा तपास  ईडीने तातडीनं स्वत:कडे घेतला होता. कारवाईचे आदेश येताच शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल या घरावर छापा टाकण्यात आला. कपूर यांनी प्रामुख्याने काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना नियमबाह्य कर्ज दिले व त्यासाठी विदेशी चलन वापरले. ही कर्जे थकीत झाली व त्यामुळेच बँक संकटात आली, या संशयावरुन ईडीने हा छापा टाकला होता.