पीटीआय, बंगळूरु : कर्नाटकातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शीवकुमार यांच्याविरोधात गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले. आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवकुमार यांच्यावर आहे. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आली असून पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय शस्त्र उगारण्यात आल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला.

प्राप्तीकर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यान्वये ईडीने कारववाई केली. ईडीने तपासादरम्यान नोंदवलेले विविध लोकांचे जबाब आणि सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपपत्र दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीने सप्टेंबर २०१८ मध्ये डी. के. शिवकुमार यांच्यासह कर्नाटक भवनमधील कर्मचारी अंजनया हनुमंता यांच्याविरोधात नवी दिल्लीत आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी २०१९मध्ये शिवकुमार यांना ईडीने अटक केली आणि त्यांची चौकशी केली होती. याप्रकरणी शिवकुमार यांची मुलगी ऐश्वर्या आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बळकर यांचीही चौकशी करण्यात आली होती. शिवकुमार यांना याप्रकरणी जामीनही मंजूर झाला होता.

दरम्यान, शिवकुमार यांनी सत्ताधारी भाजपवर टीका करत राजकीय हेतूने हे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. राजकीयदृष्टय़ा जे लोक आपल्या अडचणीचे ठरत आहेत, त्यांना संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असून त्यामुळेच ते अशा प्रकारे कारवाया करत असल्याची टीका शिवकुमार यांनी केली.