IT Raid on BBC Delhi Office : बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून येथे चौकशी केली जात आहे. यावेळी बीबीसी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोनदेखील बंद असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान बीबीसी कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ही अघोषित आणीबाणी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

मोदी सरकारवर काँग्रेसची टीका

बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. “अगोदर बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता बीबीसीवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. ही तर अघोषित आणीबाणी आहे,” अशी टीका काँग्रेसने केली आहे.

बीबीसीच्या माहितीपटामुळे देशात खळबळ

बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा “इंडिया- द मोदी क्वेश्चन” हा माहितीपट प्रदर्शित केला आहे. या माहितीपटानंतर देशात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली. या बंदीला झुगारून जेएनयू, दिल्ली तसेच अन्य विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या विद्यापीठांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.