गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. तृणमूलचे ५९ आमदार आणि २० खासदार फुटले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) तीन बँक खात्यांमधील ४४० कोटी रुपयांच्या व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली आहे.

तृणमूल काँग्रेसची ४४० कोटी रुपये जमा असलेली 3 बँक खाती ईडीने गोठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा आणखी एक धक्का असल्याचं बोललं जात आहे. कोलकात्यातील टीएमसीची ४४० कोटी रुपये जमा असलेली तीन बँक खाती ईडीने गोठवण्याचे आदेश देत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बुधवारी ही कारवाई केल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसच्या बँक खात्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत सुरू असलेल्या मनी लाँडरिंगच्या तपासाचाच एक भाग म्हणून ईडीने ही कारवाई केल्याची माहिती सांगितली जात आहे. या बरोबरच विमानसेवा, प्रवास आणि संबंधित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून १५० कोटींहून अधिक रक्कम वळवण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान चार्टर्ड विमानांसाठी वापरलेला निधी कुठून आला? त्याचा मूळ स्रोत काय होता? किंवा मूळ स्रोत लपवण्यासाठी निधी विविध संस्थांमार्फत फिरवण्यात आला का? याची देखील तपासणी केली जाणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नोंदवला होता एफआयआर

दरम्यान, एका सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम टीएमसीच्या काही बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप करणारी तक्रार जूनमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. आता या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली असून ईडीने पीएमएलए अंतर्गत तपासात सामील होण्यापूर्वी तीन पक्षांच्या खात्यांमधील व्यवहार गोठवले आहेत. तपास अधिकारी १८ टीएमसीच्या बँक खात्यांची आणि विविध कंपन्यांशी संबंधित व्यवहारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

दरम्यान, तपासाचा भाग म्हणून ईडीने मंगळवारी कोलकातामधील ५ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यामध्ये एका ट्रॅव्हल्स कंपनीचा आणि एका चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयांचा समावेश होता. या कारवाईच्या दरम्यान काही कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत.