सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि इतरांविरुद्ध कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे. आयकर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवकुमार सध्या जामिनावर बाहेर आहेत.

२०१८ चे प्रकरण
फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सप्टेंबर २०१८ मध्ये शिवकुमार, ए हौमंथैया, नवी दिल्लीतील कर्नाटक भवनचे कर्मचारी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. हा खटला आयकर विभागाने शिवकुमार आणि इतरांविरुद्ध बंगळुरूच्या न्यायालयात कथित करचोरी आणि हवाला व्यवहारांसाठी दाखल केलेल्या आरोपपत्रावर आधारित होता.

काय आहे नेमके प्रकरण?
आयकर विभागाने शिवकुमार आणि त्यांचे सहकारी एसके शर्मा यांच्यावर तीन अन्य आरोपींच्या मदतीने हवाला चॅनेलद्वारे नियमितपणे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड वाहतूक केल्याचा आरोप केला आहे. ६० वर्षीय शिवकुमार यांना २०१९ मध्ये ईडीने या प्रकरणात अटक केली होती आणि एजन्सीने त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक लोक आणि सहकार्यांची चौकशी केली होती.