तिरुवअनंतपुरम : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी छापे घातले. ‘सीएमआरएल’ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात विजयन यांची मुलगी टी वीणा यांच्याविरोधातील तपासाचा भाग म्हणून आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. दरम्यान, ही राजकीय हेतूने केलेली कारवाई असल्याची टीका माकपने केली आहे.
पिनराई विजयन यांच्यासह अन्य काही व्यक्तींशी संबंधित राज्यात एकूण १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये विजयन यांचे तिरुवअनंतपुरम येथील भाड्याचे घर, कन्नूरमधील एक जागा आणि ‘कोचिन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड’ (सीएमआरएल) या खासगी कंपनीशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरांचा समावेश आहे. टी. वीणा यांच्याशी संबंधित असल्यामुळे विजयन यांच्या घराची झडती घेण्यात आल्याचे ईडीच्या अधिकार्यांनी सांगितले. याप्रकरणी २०२४मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वीणा यांच्या ‘एक्झालॉजिक सोल्यूशन्स’ या कंपनीला २०१७ ते २०२०दरम्यान ‘सीएमआरएल’ने बेकायदा १.७२ कोटी रुपये देयक चुकते केल्याचा ईडीचा आरोप आहे. ‘एक्झालॉजिक’ने ‘सीएमआरएल’ला कोणतीही सेवा प्रदान केली नव्हती, असे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणी ईडीची कारवाई रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका ‘सीएमआरएल’ने केरळ उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.
ईडीच्या वाहनांवर हल्ले
विजयन यांच्या निवासस्थानी कारवाई करून ईडीचे अधिकारी परत जात असताना त्यांच्या वाहनांवर हल्ले करण्यात आले. हे हल्ले माकपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय आहे. ईडीचे अधिकारी परत जात असताना जमावाने त्यांची वाहने अडवण्याचा प्रयत्न केला, तसेच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी किमान तीन वाहनांवर हल्ला केला. त्यापैकी एका वाहनातून ईडीचे अधिकारी जात होते.
