परदेशातून निधी स्वीकारल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) न्यूज पोर्टल न्यूजक्लिक (NewsClick) आणि त्यांचे संस्थापक-संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना १८४ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या कारवाईमुळे न्यूजक्लिक विरोधातील चौकशी अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोर्टलला परदेशातून मिळालेल्या निधीशी संबंधित कथित उल्लंघनांची चौकशी सुरू आहे. यादरम्यान फेमा (FEMA) कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
नियमांचे उल्लंघन करून परदेशी निधी मिळवल्याच्या आरोपांवरून, सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून न्यूजक्लिकच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे.
ईडीकडून निधीचा स्त्रोत काय आहे, तो कोणत्या मार्गाने स्वीकारला गेला आणि त्यांनी फेमाच्या तरतुदींचे पालन केले की नाही याची छाननी केली जात आहे.
१८४ कोटींची नोटीस ही या तपासाचाच भाग असून याच्या माध्यमातून या कथित नियमांच्या उल्लंघनावर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
नेविल रॉय सिंघम यांची भूमिका चौकशीच्या फेऱ्यात
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, ईडीने चीनमध्ये राहणारे अमेरिकन नागरिक नेविल रॉय सिंघम यांना यापूर्वी समन्स बजावले होते. न्यूजक्लिकला निधी पुरवण्यात त्यांची कथित भूमिका असल्याचे सांगितले जाते.
सिंघम यांच्याशी संबंधित निधी पोर्टलकडे वळवण्यात आला होता का आणि असे व्यवहार भारतीय फॉरेन एक्सचेंज कायद्याला धरून होते का याची चौकशी तपास अधिकारी करत आहेत.
दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईमुळे या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळाली आहे

