अण्णा द्रमुक पक्षाचे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यावर टीका केली. विजय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही होऊ शकतात, असा टोला पलानीस्वामी यांनी लगावला. टीव्हीकेमध्ये सध्या विजय यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठीचा चेहरा म्हणून चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर पलानीस्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्य सरकारकडून सोशल मीडिया आणि व्हिडीओंच्या माध्यमातून तशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पलानीस्वामींनी केला.

पलानीस्वामी यांची टीका

“ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही होऊ शकतात. ट्रम्प यांची जागा घेऊ शकतात. त्यात काही गैर नाही. त्यांची इच्छा असेल तर ते तसे करू शकतात. ते भारताचे पंतप्रधानही होऊ शकतात,” असे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी टीका करताना म्हणाले. पलानीस्वामी यांनी यावेळी सरकारच्या कारभारावर देखील गंभीर आरोप केले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा दावा त्यांनी केला. “केवळ ११० दिवसांत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. खून, दरोडे आणि संघर्षाच्या घटना वाढत आहेत,” असे पलानीस्वामी म्हणाले.

टीव्हीके नेत्यांची उघड भूमिका

टीव्हीकेचे नेते आधव अर्जुन आणि सरतकुमार यांनी विजय यांनी जोसेफ विजय यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याबाबतची भूमिका उघडपणे मांडली आहे. काही ठिकाणी ‘विजय फॉर पीएम’चे समर्थन करणारे पोस्टरही झळकले आहेत. काँग्रेस यामुळे नाराज झाल्याचेही समोर आले. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी यापूर्वी ही मागणी ‘फॅन क्लब मानसिकता’ असल्याचे म्हटले होते.

विजय सरकारकडे काठावरचे बहुमत

विजय यांच्या सरकारसाठी राजकीय परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यांच्या सरकारकडे विधानसभेत केवळ काठावरचे बहुमत आहे. २३४ सदस्यांच्या तमिळनाडू विधानसभेत साध्या बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता असताना टीव्हीकेकडे १०७ आमदार आहेत. काँग्रेससह इतर पक्षांची मदत घेऊन टीव्हेकेने सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, टीव्हीकेचे आघाडीतील सहकारी आणि एमडीएमकेचे प्रमुख वैको यांनी विजय यांच्या मनात किंवा कल्पनेतही पंतप्रधानपदाचा असा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. तसेच, आघाडीला अडचणीत आणणारी किंवा गुंतागुंत वाढवणारी भूमिका मंत्र्यांनी सार्वजनिकरित्या मांडू नये, असा इशाराही त्यांनी दिला.