नवी दिल्ली : चीनधार्जिणा दुष्प्रचार चालविण्यासाठी बेकायदा आर्थिक मदत घेतल्याच्या आरोपात ‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाचे कार्यालय तसेच संस्थापक-संपादक, ज्येष्ठ पत्रकार, योगदानकर्ते, कर्मचारी यांच्या घरांवर सोमवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने छापे टाकले. दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत (यूएपीए) दाखल गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून दहापेक्षा अधिक पत्रकारांची पोलिसांनी चौकशी केली आहे. ‘न्यूजक्लिक’चे संपादक प्रबीर पूरकायस्थ यांना अटक करण्यात आली आहे.दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम तसेच, मुंबई अशा ३५ हून अधिक ठिकाणी पोलिसांनी एकाच वेळी ही कारवाई केली. सुमारे २०० पोलिसांच्या वेगवेगळय़ा तुकडय़ांनी मध्यरात्री २ वाजता छापे टाकण्यास सुरुवात केली. मुंबई व एनसीआरमधील कारवाई

एकाच वेळी सुरू झाली. ‘न्यूजक्लिक’चे संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि लेखिका गीता हरिहरन, पत्रकार अभिसार शर्मा, ज्येष्ठ पत्रकार भाषा सिंह व उर्मिलेश, पत्रकार-अर्थविश्लेषक अिनद्यो चक्रवर्ती, इतिहासकार सोहेल हाश्मी, व्यंगचित्रकार-स्टँड-अप कॉमिक संजय राजौरा, व्यंगचित्रकार इरफान खान, स्तंभलेखिका अनुराधा रमन, सत्यम तिवारी, आदिती निगम, सुमेधा पाल, सुबोध वर्मा, ज्येष्ठ पत्रकार परंजॉय गुहा ठाकुर्ता यांच्या घरांवर छापे टाकले गेले. या प्रकरणी अजून कोणालाही अटक झालेली नाही. या कारवाईसंदर्भात दिल्ली पोलिसांनी अधिकृत कोणतेही भाष्य केलेले नाही.   मुंबईमध्ये सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांच्या घरांवर करवाई केली गेली. सेटलवाड या ‘ट्रायकॉन्टिनेंटल-इन्स्टिटय़ूट फॉर सोशल रिसर्च’ संस्थेच्या संचालक असून या संस्थेने ‘न्यूजक्लिक’मध्ये लेखांचे योगदान दिले आहे. दिल्लीतील ‘माकप’च्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मुलगा ‘न्यूजक्लिक’बरोबर काम करत असल्याने ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी यांच्या घरावरही पोलिसांनी छापा टाकला. भारतीय दंडविधान १५३ (अ) अंतर्गत धर्म, वंश, स्थानाच्या आधारावर विविध गटांमधील वैर वाढवणे तसेच १२० (ब) अंतर्गत कटकारस्थान करण्याच गुन्हा दाखल झाला आहे. तसेच यूएपीएमधील अनुच्छेद १३, १६, १७ व २२ अंतर्गत दहशतवादी कृत्ये करणे, त्यासाठी निधी जमवणे, कटकारस्थान करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>‘या’ तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्रातलं नोबेल जाहीर, ब्रह्मांडाच्या वयापासून ते वैद्यकीय तपासण्यांपर्यंत उपयोगी संशोधन केल्याबद्दल सन्मान

अमेरिकेतील लेखाचा संदर्भ

या वर्षी ऑगस्टमध्ये ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने शोधलेख प्रकाशित केला होता, त्यामध्ये ‘न्यूजक्लिक’ला चिनी प्रचारासाठी नेव्हिल रॉय सिंघम यांच्याशी जोडलेल्या नेटवर्कद्वारे निधी पुरवला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या शोधलेखाचा उल्लेख भाजपचे लोकसभेतील खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात केला होता.

निषेधाचे सूर

प्रेस क्लब ऑफ इंडियाने या कारवाईचा निषेध केला असून सरकारने सर्व तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांच्या अन्य संस्था-संघटना तसेच सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतील एम. के. रैना, प्रभात पटनायक, इरफान हबीब, झोया हसन, मालिनी भट्टाचार्य यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी या कारवाईविरोधात आवाज उठविला आहे. 

हेही वाचा >>>“तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा; निज्जर हत्या प्रकरण चिघळणार?

प्रश्नांची सरबत्ती

‘न्यूजक्लिक’शी संबंधित छापा टाकण्यात आलेल्या दहाहून अधिक पत्रकारांची दिल्ली पोलिसांनी लोधी इस्टेट येथील कार्यालयात कसून चौकशी केली. त्यातील बहुतेकांना पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी सोडून दिले. पत्रकार-योगदानकर्त्यांना पोलिसांनी २०-२५ प्रश्न विचारल्याचे समजते. कृषि कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन, नागरिकत्व कायद्याविरोधातील शाहीन बाग आंदोलन, करोना काळातील घटना आदींचे वृतांकन तसेच मणिपूर वा ईशान्येकडील राज्यांना दिलेल्या भेटींबाबत ही प्रश्नावली असल्याचे समजते.\

आरोप काय?

कंपनीला ८६ कोटींहून अधिक परदेशी निधी, प्रामुख्याने चिनी अर्थसाह्य गैरमार्गाने झाल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ऑगस्टमध्ये पुरकायस्थ यांच्या घरावर जप्ती आणली होती. तत्पूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांच्या घरी छापा टाकण्यात आला. भारतामध्ये चीनच्या धोरणांचे समर्थन करणे व त्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने अमेरिकेतील करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांच्याकडून निधी मिळाल्याचा आरोप केंद्रीय तपास यंत्रणांनी ठेवला आहे. ‘ईडी’प्रमाणे दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखाही (ईओडब्लू) चौकशी करत असून १७ ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने यूएपीएअंतर्गत नवा गुन्हा दाखल केला आहे.

तपास यंत्रणा स्वायत्त असून नियमांच्या आधारे त्या काम करतात. कोणी काही चूक केली असेल तर तपास यंत्रणा त्यांची चौकशी करतील. अवैध मार्गाने पैसे मिळाले असतील वा तुम्ही काही आक्षेपार्ह कृत्य केले असेल तुमच्यावर कारवाई होईल.- अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

Story img Loader