NEET चा पेपर फुटल्याने ती परीक्षा पुन्हा घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी असोत किंवा कॉक्रोच जनता पार्टी या सगळ्यांनीच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास आपण स्वत: देशातील विविध शहरांमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याची तसेच त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीतच देशभरातील विद्यार्थी आणि तरूणांना एकत्र करून आंदोलन करणार असल्याची घोषणा कॉक्रोच पार्टीने केली होती, आता धर्मेंद्र प्रधान यांचं याबाबतचं म्हणणं समोर आलं आहे.

धर्मेंद्र प्रधान नेमकं काय म्हणाले?

NEET ची परीक्षा पुन्हा एकदा २१ जूनला घेतली जाणार आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही विश्वास ठेवून अभ्यास करा. नीटची परीक्षा व्यवस्थित घेतली जाईल. सगळ्यांनाच मी सहकार्य करण्याचं आवाहन करतो आहे. तसंच NTA हा निर्णय घेतला आहे की यावेळी विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा अधिकचा वेळ दिला जाईल अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याची केंद्र सरकारवर नामुष्की

३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली कारण नीट परीक्षेचा पेपर फुटला होता हे नंतर उघडकीस आलं. २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. देशभरात नीट परीक्षा पार पडण्याच्या ४२ तास आधीच हा पेपर फुटला होता ही माहिती नंतर समोर आली ज्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. पेपरीफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे.

विरोधकांच्या रडारवर धर्मेंद्र प्रधान

१० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून कारकिर्दीला ४ हजार ३९९ दिवस पूर्ण झाले. दुसरीकडे त्याच दिवसापासून कॅबिनेटमध्ये फेरबदल होतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान हे विरोधी पक्षाच्या आणि नव्याने सुरू झालेली चळवळ असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या रडारवर आहेत. नीट परीक्षेची पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या या सगळ्या बाबींची नैतिक जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेसने आणि CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीने केली आहे. मागील शनिवारी या मागणीसाठी जंतर मंतर या ठिकाणी सीजेपीचं आंदोलनही झालं. त्यानंतर सीजेपीने पुण्यातही आंदोलन केलं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. धर्मेंद्र प्रधान यांनी मात्र विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यास करण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.