शिक्षण क्षेत्रात सुधारणांची गरज असून नवे बदल हे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून केले जावेत, असे प्रतिपादन केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी केले. ज्यायोगे मुले आपली स्वप्नं आणि मनीषा पूर्ण करण्याकडे वाटचाल करू शकतील अशी शैक्षणिक संरचना निर्माण करायला हवी, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भाऊबीजेच्या दिवशी भारताने मंगळयान प्रक्षेपित केले. एकीकडे असे उपग्रह प्रक्षेपित केले जात असताना देशभरात असलेले २२ कोटी उपग्रह (लहान मुले) दुर्लक्षून कसे चालेल, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. या प्रत्येक उपग्रहाची स्वत:ची अशी क्षमता आहे, तिला प्रोत्साहन द्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. येथे सीआयआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल युनिव्हर्सिटी इंडस्ट्री काँग्रेस’मध्ये ते बोलत होते.
यापुढील शिक्षणाचे लक्ष्य अभ्यासक्रमाकडे नव्हे, तर लहान मुलांच्या आकांक्षांकडे असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आगामी १० वर्षांचा ‘नियोजनबद्ध कार्यक्रम’ तयार करायला हवा, असेही त्यांनी सुचवले. अभियांत्रिकीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.