आंतरराष्ट्रीय संशोधनातील निष्कर्ष

मुलांची शैक्षणिक पातळी ही काही अंशी जनुकांवर अवलंबून असते असे एका नव्या अभ्यासात दिसून आले आहे. जनुकांचा संबंध शैक्षणिक कामगिरीशी असतो त्याशिवाय गर्भाशयात असताना मेंदूची वाढ कशाप्रकारे होते याच्याशीही शैक्षणिक प्रगती अवलंबून असते. काही जनुके ही अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश, स्किझोफ्रेनिया यांच्याशी निगडित असतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय गटाने हे संशोधन केले असून व्यक्तिगत पातळीवरील शैक्षणिक कामगिरीशी निगडित असलेले ७४ जनुकीय घटक शोधले आहेत, आतापर्यंतचा हा सर्वात मोठा जनुकीय अभ्यास आहे. या अभ्यासातून १ लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास करण्यात आला असून त्यात काही जनुकीय घटक हे शैक्षणिक कामगिरीशी निगडित आहेत, असे अमेरिके तील सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॅनिएल बेंजामिन यांनी सांगितले. यावेळी पाहणीचा नमुना मोठा असून तीन लाख लोकांमध्ये जनुकीय घटकांचा संबंध हा शैक्षणिक कामगिरीशी दिसून आला आहे. जनुकीय व पर्यावरणीय घटक हे एखादी व्यक्ती शाळकरी वयात कशी कामगिरी करते यावर परिणाम करीत असतात. जनुके बोधनक्षमतेवर व व्यक्तिमत्त्वावर अंशत: परिणाम करतात. त्यात एखादी व्यक्ती शालेय पातळीवर किती वर्षे राहते याचा समावेश होतो. वैज्ञानिकांच्या मते पंधरा वेगवेगळ्या देशातील ६४ माहितीसंचातून घेतलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. जनुकीय घटक त्या व्यक्तीच्या शैक्षणिक कालावधीशी निगडित असतात. अर्थात हे निष्कर्ष युरोपीय वंशाच्या व्यक्तींशी संबंधित आहेत. ७४ जनुकीय घटकांचा प्रभाव शैक्षणिक कामगिरीवर ०.४३ ते १ टक्का इतकाच होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. काही लोकांमध्ये जनुकीय घटकांच्या शून्य ते दोन प्रती आढळून आल्या आहेत त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती यथातथाच राहिली, त्यांना शाळेत जास्त काळ घालवावा लागला, याचा अर्थ काही हजार लोकात हा परिणाम  दिसतो लाखोत लोकात नाही, हे जनुकीय घटक नेमके कोणते हे अजून ओळखता आलेले नाहीत. पूर्वीचे संशोधन व आमचा अभ्यास यातून संशोधकांनी सांगितले की, शैक्षणिक कामगिरीशी संबंध असलेली जनुके मेंदूच्या वाढीवर जन्माआधीच म्हणजे गर्भाशयात असताना परिणाम करीत असतात. ही जनुके बोधनक्षमता व व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतात. अगदी लहान जनुकीय घटकातून एखाद्या व्यक्तीची बोधनक्षमता कमी का झाली यावर प्रकाश पडतो, असे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड ब्रेन इन्स्टिटय़ूटचे पीटर विशर यांनी म्हटले आहे. नेचर या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.