अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे बिंग फोडणारा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन हा हाँगकाँगहून पोबारा केल्यानंतर रशियात आला तेथून तो हवाना मार्गे इक्वेडोरला जाणे अपेक्षित असताना तो गेलाच नाही, गेले चार दिवस तो मॉस्को विमानतळाजवळच वास्तव्यास आहे, तो पुढे कुठे जाणार याबाबत अजूनही गूढ कायम आहे, त्याला अमेरिकेत परत पाठवून द्यावे अशी विनंती अमेरिकेने केली असली तरी त्याला अमेरिकेच्या ताब्यात देण्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नकार दिला आहे. स्नोडेनने इक्वेडोरकडे आश्रय मागणारी विनंती केली असून स्नोडेनला आश्रय दिल्यास अमेरिका आपली निर्यात बंद करील अशी भीती तेथील विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.
स्नोडेनला रशियातून हाकलण्यासाठी पूर्ण कायदेशीर आधार आहे असे अमेरिकेने रशियाला सांगितले आहे. गोपनीयता विरोधी संकेतस्थळ असलेल्या विकिलीक्सने स्नोडेनला हाँगकाँगहून मॉस्कोत येण्यास मदत केली आहे. विकिलीक्सच्या मते स्नोडेन कायमचा रशियात अडकून पडण्याची भीती आहे.
दरम्यान व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे योगायोगाने पुढील आठवडय़ात ऊर्जा शिखर बैठकीसाठी मॉस्कोत येत आहेत. मादुरो यांनी असे सांगितले की, इक्वेडोरप्रमाणेच आम्ही स्नोडेनच्या आश्रय मागणाऱ्या विनंतीची तपासणी करू.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी स्नोडेन मॉस्कोत असल्याचे प्रथमच अधिकृतपणे मान्य केले असून त्याने विमानतळावरील तात्पुरता निवारा सोडलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तो प्रवासी म्हणून आलेला आहे, देशाची सीमा ओलांडून तो आलेला नाही असे पुतिन यांनी फिनलंड येथे सांगितले.