भारताने सोमवारी बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी ढाक्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली. बांगलादेशबरोबर आपल्याला सकारात्मक, रचनात्मक आणि परस्पर लाभदायक संबंध हवे आहेत असे मिस्राी यांनी या वेळी स्पष्ट केले. या भेटीमुळे दोन्ही बाजूंना द्विपक्षीय आढावा घेण्याची संधी मिळाली असे त्यांनी सांगितले.
शेख हसीना यांच्याविरोधातील बंडानंतर त्या सत्ता सोडून ५ ऑगस्टपासून भारतात राहत आहेत. त्याशिवाय बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याच्याही घटना घडल्या आहेत. तेथील हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना गेल्या महिन्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली असून त्यांच्या सुटकेची मागणी करत भारतामध्ये हिंदुत्ववादी संघटना निदर्शने करत आहेत. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर विक्रम मिस्राी हे त्या देशाला भेट देणारे पहिले उच्चस्तरीय अधिकारी आहेत.
हे ही वाचा… महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जाशिम उद्दिन यांच्याबरोबर आपली स्पष्ट, पूर्वग्रहरहित आणि रचनात्मक चर्चा झाली असे विक्रम मिस्राी यांनी सांगितले. ‘‘द्विपक्षीय संबंध जनतेला केंद्रस्थानी ठेवून आहेत, त्याचा सर्वांना फायदा होतो हे पाहिले आहे आणि भविष्यातही हे संबंध कायम ठेवावेत असे आम्हाला वाटते,’’ असे मिस्राी म्हणाले.
अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण याबद्दल, इतर मुद्द्यांबद्दल आम्हाला वाटणारी चिंता मी त्यांच्या कानावर घातली. तसेच सांस्कृतिक, धार्मिक आणि राजनैतिक मालमत्तांवर झालेल्या हल्ल्यांसंबंधी खेदजनक घटनांवरही आम्ही चर्चा केली. – विक्रम मिस्राी, परराष्ट्र सचिव
अंतर्गत बाबींत हस्तक्षेप नको : बांग्लादेश
भारताने बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांच्या खेदजनक घटनांचा दाखला बैठकीत दिला. परंतु या घटना भ्रामक आणि खोट्या असल्याचे सांगत, कोणत्याही देशाने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असे बांगलादेशने म्हटले आहे. दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, भारतातील ‘नकारात्मक मोहीम’ थांबवण्यासाठी भारताच्या सक्रिय सहकार्याची अपेक्षा बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीम उद्दिन यांनी ठेवली आहे.