नवरा बायकोचा वाद टोकाला गेला तर काय होऊ शकतं? याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. जेवणाच्या वेळी अंडा करी वरुन जो वाद झाला त्यानंतर पतीची जीभ पत्नीने चावली. पती आणि पत्नीतला वाद विकोपाला गेला तर काय घडू शकतं याचं उदाहरण या बातमीच्या निमित्ताने समोर आलं आहे.
कुठे घडली घटना?
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पतीच्या जिभेचा चावा घेणाऱ्या पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेगमाबाद भागातील संजयपुरी या ठिकाणी ही घटना घडली. इशा नावाच्या महिलेने तिच्या पतीच्या जिभेचा इतका जोरात चावा घेतला की त्याच्या जिभेचा तुकडा पडला. विपिन आणि इशा यांचं लग्न मागच्या वर्षी जून महिन्यात झालं होतं. विपिनला आता मेरठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या जिभेचा जो तुकडा पडला आहे तो पुन्हा जोडता येणार नाही, शस्त्रक्रिया करुन काही उपयोग नाही असं डॉक्टरांनी विपिनच्या कुटुंबाला कळवलं आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
विपिनच्या पालकांनी काय सांगितलं?
विपिनच्या आईने सांगितलं की लग्नानंतर महिन्याभरानंतर या दोघांमध्ये भांडण सुरु झालं. जून २०२५ या दोघांचं लग्न झालं होतं. पण नंतर लगेच दोघांमध्ये खटके उडू लागले. विपिनचे आई वडील राम अवतार आणि गीता यांनी या प्रकरणी इशावर आरोप केले आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच आम्हाला इशाने सांगितलं मी इथे माझ्या मर्जीने राहणार आहे. ती घरात आल्यापासून मनमानीच करत होती असंही या दोघांनी म्हटलं आहे. इशा ही मेरठच्या मलियाना येथील आहे. विपिनशी लग्न झाल्यानंतर इशा खूपच मनमानी करत होती. माझ्या विरोधात तुम्ही एक शब्दही बोलाल तर खबरदार असं ती आम्हाला आणि विपिनला बजावत असे असं गीता यांनी सांगितलं.
