पॅरिसहून कैरोला जाणारे इजिप्त एअरलाइन्सचे एक विमान गुरुवारी इजिप्त हवाई हद्दीच्या रडारवरून बेपत्ता झाल्यानंतर भूमध्य समुद्रात कोसळले. या विमानात २६ परदेशी प्रवाशांसह एकूण ६६ प्रवासी होते. सदर विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला की दहशतवादी हल्ला होता यापैकी कोणतीही शक्यता फेटाळता येणार नाही, असे इजिप्तने म्हटले आहे.
या विमानाचे अवशेष मिळेपर्यंत आम्ही ते विमान बेपत्ता आहे असे म्हणत आहोत, असे इजिप्तचे नागरी हवाई वाहतूकमंत्री शेरीफ फती यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दहशतवादी हल्ला अथवा तांत्रिक बिघाडाची शक्यता आम्ही फेटाळत नसल्याचे ते म्हणाले. तर सदर विमान तांत्रिक कारणास्तव कोसळले की दहशतवादी हल्ला करण्यात आला याबाबत त्वरित निष्कर्ष काढता येणार नाही, आम्ही कोणतीही शक्यता फेटाळत नाही, असे इजिप्तचे पंतप्रधान शेरीफ इस्माईल यांनी कैरौ विमानतळावर वार्ताहरांना सांगितले.
एअरबस ए३२० हे विमान जवळपास ३७ हजार फूट उंचीवरून उडत होते, इजिप्तच्या हवाई हद्दीत आल्यानंतर ते स्थानिक वेळेनुसार पहाटे २.४५ वाजता रडारवरून अचानक बेपत्ता झाले. बंदराचे शहर असलेल्या अलेक्झांड्रिया येथे २८० कि.मी. तटवर्ती क्षेत्राजवळ रडारवरून ते बेपत्ता झाले. त्यानंतर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी विमान कोसळल्याचे सांगितले. विमानाच्या अवशेषांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रडारवरून विमान बेपत्ता झाल्यानंतर दोन तासांनी दु:खद संदेश आला, असे इजिप्त एअरने म्हटले आहे, मात्र अशा प्रकारचा कोणताही संदेश आल्याचे वृत्त इजिप्तच्या लष्कराने फेटाळले आहे. इजिप्तचे लष्कर आणि मदतकार्य पथक विमानांचे अवशेष शोधत आहेत विमानात एक लहान मूल, दोन अर्भके आणि १० कर्मचारी आणि ५६ प्रवासी होते. फ्रान्सचे १५, इराकचे दोन, तर ब्रिटन, बेल्जियम, कुवैत, सौदी अरेबिया, सुदान, चाड, पोर्तुगाल, अल्जेरिया आणि कॅनडाचा प्रत्येकी एक प्रवासी होता.
विमानाचे अवशेष शोधण्याच्या कार्यात इजिप्तच्या लष्कराला ग्रीसच्या विमानांचे आणि नेव्हीच्या नौकांचे सहकार्य मिळत आहे. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-मार्क अयरॉल्ट यांनी शोधकार्यासाठी लष्करी विमाने आणि बोटी पाठविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी तातडीची बैठक बोलावून इजिप्तचे अध्यक्ष अब्देल-फताह एल-सिस्सी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.
मार्च महिन्यांत इजिप्त एअरच्या एका विमानाचे अलेक्झांड्रिया येथून सायप्रसला अपहरण करण्यात आले होते. आपल्या माजी पत्नीला भेटण्याची मागणी अपहरणकर्त्यांने केली होती. आपण शरीराभोवती स्फोटके बांधली असल्याचा दावाही त्याने केला होता.

ग्रीकमधील क्रेट बेटावर विमानाचे अवशेष सापडले
अथेन्स- इजिप्त एअरच्या कोसळलेल्या विमानाचे अवशेष क्रेट या ग्रीकवरील बेटाजवळ सापडल्याचे वृत्त ग्रीकच्या लष्करी प्रवक्त्याने दिले. क्रेटच्या वायव्येकडे काही अवशेष सापडल्याचे आणि इजिप्तच्या सी-१३० विमानातून काही अवशेष तरंगत असल्याचे आढळून आले असून तपासासाठी जहाजे पाठविण्यात आली आहेत, असे प्रवक्त्याने सांगितले.