इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थक व लष्कर यांच्यातील संघर्ष अद्याप सुरूच आहे. लष्कराने मोर्सी समर्थकांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्याने या आंदोलकांनी आता मशिदींचा आश्रय घेतला असून शनिवारी कैरोतील रामसीस विभागातील एका मशिदीच्या आवारात मोठा रक्तपात झाला. या हिंसाचारात ८० जण ठार झाल्याने इजिप्तमधील तणाव वाढतानाच दिसत आहे.
मोर्सीसमर्थक मुस्लीम ब्रदरहूडने शुक्रवारचा दिवस ‘संतापाचा दिवस’ म्हणून पाळला होता. यावेळी नमाजपठण झाल्यानंतर हजारो आंदोलकांनी कैरोतील मुख्य सरकारी इमारतीच्या दिशेने कूच केले होते, मात्र लष्कर व पोलिसांनी त्यांना रोखले होते. आंदोलकांनी पोलिसांच्या दोन गाडय़ा पेटवून दिल्याने १० पोलीस जखमी झाले. या आंदोलकांना पांगविण्यासाठी सुरक्षारक्षकांनी हवेत गोळीबार केला तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या होत्या.
रामसीसमधील एका मशिदीत हजारो सशस्त्र आंदोलक लपून बसल्याचे समजल्यानंतर लष्कराने या मशिदीकडे मोर्चा वळविला. मशिदीतील महिलांनी बाहेर पडावे असे आवाहन लष्कराने केले, मात्र महिलांसह पुरुषांनाही सुरक्षेची हमी मिळणार असेल तरच आम्ही बाहेर येतो, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली. अखेर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला व रात्री उशिरापर्यंत यात सुमारे ८० जण मृत्युमुखी पडले.
जवाहिरीच्या भावाला अटक
अल कायदाचा म्होरक्या आयमान-अल-जवाहिरीचा भाऊ मोहम्मद जवाहिरी याला शनिवारी इजिप्तच्या लष्कराने गिझा येथे अटक केली. मोहम्मद हा कट्टर मोर्सीसमर्थक असून सध्या इजिप्तमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षात्मक उपाय म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.  
‘ब्रदरहुड’ नेत्याचा मुलगा ठार
येथील रॅमसेस चौकात लष्कर आणि फ्रीडम आणि जस्टीस पक्षात सुरू असलेल्या संघर्षांत मुस्लीम ब्रदरहुडचे नेते मोहम्मद बैदी यांचा मुलगा अमर गोळीबारात ठार झाला.
याखेरीज मुस्लीम ब्रदरहुडचे संस्थापक हसन अल-बन्ना यांचा नातू खलीद फर्नास अब्दील-बसीत हादेखील कैरोत सुरू असलेल्या चकमकीत ठार झाला. पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थक रॅमसेस चौकातील कैरोतील अल-फतेह मशिदीत अजूनही आहेत. तेथे जोरदार संघर्ष सुरू आहे. अमर बैदीचे वडील मोहम्मद यांना हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.