पैगंबरांच्या मानव कल्याणाच्या शिकवणीला अनुसरुया; उद्धव ठाकरेंकडून ‘ईद ए मिलाद’च्या शुभेच्छा

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ‘ईद ए मिलाद’निमित्त शुभेच्छा देणारं ट्विट करण्यात आलेलं आहे.

uddhav thackeray

‘ईद ए मिलाद’निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देताना प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीला अनुसरून स्नेह वृद्धिंगत करण्याचं आवाहन केलंय. तर मोदींनीही शुभेच्छा देत सर्वांची भरभराट होवो असं म्हटलं आहे.

“ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या मानव कल्याणाच्या शिकवणीला अनुसरून स्नेह वृद्धिंगत करूया, तसेच उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करून आरोग्याचीही काळजी घेऊया,” असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींनीही बंधुता आणि शांतीसाठी प्रार्थना केलीय. “‘मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा’, सगळीकडे भरभराट आणि शांती नांदू दे. दयाभाव आणि बंधुता कायम राहू दे, ईद मुबारक”, असं मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशामध्ये शांतता आणि एकता कायम ठेवण्यासंदर्भातील भाष्य करत शुभेच्छा दिल्यात. “सर्व नागरिकांना खास करुन सर्व मुस्लीम बांधवांना आणि भगिनींना ईद ए मिलादउन-नबी म्हणजेच मोहम्मद पैगंबरांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असं म्हणत राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्यात. “आपण सर्वांना पैगंबरांच्या आयुष्याकडून, त्यांच्या विचारांकडून आणि त्यांनी समाजाच्या भरभराटीसाठी केलेल्या कार्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. देशामध्ये शांतता आणि एकता कायम ठेवली पाहिजे,” असं राष्ट्रपती म्हणाले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमाच्या अनुषंगाने ‘ईद ए मिलाद’साठी मुंबई व उपनगरांत एकेक मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही मिरवणुकीमध्ये प्रत्येकी पाच ट्रक व प्रत्येक ट्रकमध्ये पाच जणांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eid milad un nabi cm uddhav thackeray pm modi president kovind extend greetings to nation scsg

Next Story
“राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, तस्करीदेखील करतात,”; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी