Eiffel Tower closed Controversy : स्वामीनारायण संप्रदायाशी संबंधित १०० जणांच्या शिष्टमंडळाने पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरला भेट दिल्यानंतर फ्रान्समध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन केलं आणि त्यानंतर हे टॉवर पर्यटकांसाठी तात्पुरतं बंद ठेवण्यात आलं.

आयफेल टॉवर तात्पुरतं बंद ठेवण्याची वेळ आल्याप्रकरणी आता जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या संपूर्ण वादावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही प्रतिक्रिया देत महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘संकुचित मानसिकता असलेल्या पुरुषांना धर्माचे रक्षक बनू देऊ नका’, असं अभिजीत दिपके यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

“संकुचित मानसिकता किंवा संकुचित विचारसरणीच्या पुरुषांना धर्माचे रक्षक बनू देऊ नका. जे पुरुष श्रद्धेचा वापर करून महिलांवर नियंत्रण ठेवतात, त्यांना नैतिकतेचे धडे देतात आणि इतरांचं स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांच्यामुळे धर्म आणि देश, दोन्हीचीही फक्त बदनामीच होईल”, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

आयफेल टॉवर परिसरात काय घडलं? नेमकं वाद काय?

आयफेल टॉवरच्या कर्मचारी आणि व्यवस्थापनाने जागतिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेशी (BAPS) संबंधित सुमारे १०० जणांच्या गटाने शनिवारी पॅरिसमधील आयफेल टॉवरला भेट दिली होती. या भेटीदरम्यान तिथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेहमीच्या कामाच्या ठिकाणांवरून हटवून त्यांच्या जागी पुरुष सहकाऱ्यांना उभं करण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकारामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि अपमानाची भावना पसरली.

शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कर्मचाऱ्यांमधील नाराजी अधिक तीव्र झाली. त्यानंतर सोमवारी कर्मचाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून निषेध आंदोलन सुरू केलं. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाला पर्यटकांसाठी आयफेल टॉवरचे दरवाजे बंद ठेवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण फ्रान्समध्ये एका नव्या वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळालं. पॅरिसच्या स्थानिक प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. आयफेल टॉवर व्यवस्थापनाने घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली आहे आणि स्वामीनारायण संस्थेनेही या प्रकरणी अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.