बीएपीएस (BAPS) या हिंदू धार्मिक संस्थेच्या प्रतिनिधीमंडळाच्या भेटीदरम्यान आयफेल टॉवरवर महिला कर्मचाऱ्यांना काही भागांत न जाण्याच्या सूचना दिल्याच्या वृत्तावर भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (५ सप्टेंबर) स्पष्ट केले की, हा मुद्दा पूर्णपणे संबंधित संस्थांमधील वैयक्तिक विषय आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरला बी.ए.पी.एस. स्वामिनारायण संस्थेच्या प्रतिनिधीमंडळाने भेट दिली होती. या भेटीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट ठिकाणी न जाण्यास आणि प्रतिनिधींशी संवाद मर्यादित ठेवण्यास सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे आयफेल टॉवरमधील कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केले, ज्यामुळे सोमवारी आयफेल टॉवर पर्यटकांसाठी बंद ठेवावा लागला होता. फ्रेंच वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, स्थानिक कामगार संघटनेने या प्रकाराचा तीव्र निषेध करत लिंगभेदाच्या आधारावर महिला कर्मचाऱ्यांना बाजूला सारणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण काय?
या वादावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “पॅरिस परिसरात बीएपीएस संस्थेने नवीन मंदिराचे उद्घाटन केल्याची माहिती आम्हाला आहे. मात्र, आयफेल टॉवरबाबत निर्माण झालेला प्रश्न हा पूर्णपणे संबंधित संस्थांमधील परस्पर विषय आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित केले होते. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल म्हणाले, “अशा प्रकारच्या शुभ प्रसंगी पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेश देणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या प्रकरणातही त्यांनी व्हर्च्युअल पद्धतीने शुभेच्छा दिल्या. त्यामुळे यावर वेगळी टिप्पणी करण्याची कोणतीही गरज नाही.”
स्वामिनारायण संस्थेने मांडली बाजू
या वादानंतर ‘बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था’ (BAPS) ने स्पष्टीकरण जारी केले आहे. प्रतिनिधीमंडळाची संख्या मोठी असल्याने सामान्य पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी टॉवर उघडण्याच्या वेळेतच या भेटीचे आयोजन करण्यात आले होते, असे संस्थेने सांगितले.
संस्थेने पुढे स्पष्ट केले की, “आम्ही उपस्थित केलेल्या सर्व चिंतेची गंभीर दखल घेतली आहे. आमच्या माहितीनुसार कोणालाही आयफेल टॉवरमध्ये प्रवेश नाकारण्यात आला नव्हता. तरीही यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास किंवा गैरसोय झाली असल्यास आम्ही दिलगीर आहोत. आमचा परस्पर आदर आणि सेवेच्या मूल्यांवर पूर्ण विश्वास आहे.”
फ्रान्समधील राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया
या घटनेनंतर फ्रान्सच्या राजकीय वर्तुळातून कडक शब्दांत प्रतिक्रिया उमटल्या आहेत:
- पॅरिसचे महापौर इमॅन्युएल ग्रेगोयर: “महिलांना अशा प्रकारे दूर ठेवणे पूर्णपणे अमान्य आहे. ही बाब आयफेल टॉवरच्या आणि फ्रान्सच्या मूल्यांच्या विरोधात आहे.” या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
- समानता मंत्री ऑरॉर बर्गे: “फ्रान्समध्ये महिलांना स्वतःचे अस्तित्व लपवण्यास सांगणे स्वीकारार्ह नाही. कोणताही धर्म किंवा नियम फ्रान्सच्या कायद्यांपेक्षा वर असू शकत नाही.”
- उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ले पेन: “महिलांच्या उपस्थितीवर कोणतेही निर्बंध फ्रान्स कधीही सहन करणार नाही.”
- माजी पंतप्रधान गॅब्रिएल अत्तल: “कोणतीही संस्कृती, श्रद्धा किंवा धर्म फ्रान्समधील महिलांचे स्थान ठरवू शकत नाही.”
