मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये युट्यूबरसह आठ जणांचे कपडे काढून त्यांना उभे केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी गुरुवारी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले. “उपविभागीय पोलीस अधिकारी गायत्री तिवारी या प्रकरणाची चौकशी करतील आणि त्यानंतर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांनी केलेला गुन्हा विचारात न घेता, अशी कृती (वस्त्र काढणे) स्वीकारार्ह नाही,” असे सिधीचे एसपी मुकेश श्रीवास्तव यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.


“प्रथमदर्शी पुराव्याच्या आधारे, आम्ही टाउन इन्स्पेक्टर मनोज सोनी आणि स्टेशन हाऊस ऑफिसर अभिषेक सिंग यांना पोलिस लाइनमध्ये जोडले आहे. सिंग त्यावेळी पोलीस ठाण्यात हजर असल्याने त्यांचीही बदली करण्यात येत आहे,” ते म्हणाले. हा फोटो २ एप्रिल रोजी काढण्यात आला आणि एका कॅप्शनसह सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं. कॅप्शन असं होतं : “यूट्यूब पत्रकारांना भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांच्या विरोधात वार्तांकन केल्याबद्दल पोलीस ठाण्यात कपडे काढून उभं करण्यात आलं.”


एसपी श्रीवास्तव म्हणाले की, कोतवाली पोलिसांनी २ एप्रिल रोजी भाजप आमदार आणि त्याच्या कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी थिएटर कलाकार नीरज कुंदर याला अटक केली होती. “भाजपच्या एका आमदाराने १६ मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी फेसबुककडून पोस्ट आणि आयपी अॅड्रेसचा तपशील मागवला. तपासात नीरज कुंदरशी संबंध आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली,” असंही श्रीवास्तव यांनी सांगितलं.


अटकेला विरोध करण्यासाठी, कुंदरचे नातेवाईक आणि मित्र आणि YouTuber अशा सुमारे ४० जणांच्या गटाने संध्याकाळी पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि घोषणाबाजी सुरू केली. “या संदर्भात त्यांना प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र त्यांचे कपडे का काढले आणि कोणी केले याचा तपास सुरू आहे. संबंधित एसडीपीओ ज्यांच्या अंतर्गत पोलीस स्टेशन येते त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे आणि जो कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, ” असंही एसपी म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना ताब्यात घेण्यात आले होते त्यांच्यावर आयपीसी कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.