एपी, जेनिन निर्वासित शिबीर (वेस्ट बँक)

ताब्यातील पश्चिम किनारा प्रदेशात (वेस्ट बँक) कार्यरत असलेल्या इस्रायली फौजांनी गेल्या चोवीस तासांत किमान आठ पॅलेस्टिनींना ठार केले असल्याचे पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. दरम्यान, इस्रायल व हमास यांच्यात गाझा पट्टीत सुरू असलेल्या लढाईतील ठिसूळ विरामाचा रविवारी तिसरा दिवस होता.बंडखोरांचा बालेकिल्ला असलेल्या जेनिनमध्ये पाच पॅलेस्टिनी ठार झाले, तर शनिवार सकाळपासून वेस्ट बँकच्या निरनिराळय़ा भागांत आणखी तीन जण ठार झाल्याचे पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. मध्य वेस्ट बँकमधील अल-बिरेह येथे मारल्या गेलेल्यांपैकी एक जण अल्पवयीन असल्याची माहिती त्यांनी दिली.

 या वर्षीच्या सुरुवातीला एक इस्रायली पुरुष व त्याचा मुलगा यांची हत्या केल्याचा संशय असलेल्या एका पॅलेस्टिनीला अटक करण्यासाठी आपण जेनिन निर्वासित शिबिरात गेलो होतो. या मोहिमेदरम्यान झालेल्या गोळीबारात आपण पाच पॅलेस्टिनींना ठार केले, असे इस्रायली लष्कराने सांगितले. हे पाच जण अतिरेकी असल्याचे लष्कर म्हणाले, मात्र ते आपले सदस्य असल्याचा दावा कुठल्याही गटाने आतापर्यंत केलेला नाही.दाट लोकवस्तीच्या उपनगरातील या निर्वासित शिबिरात, रस्त्यांवर राडारोडा पसरला होता आणि एका घराच्या भिंतीला मोठे भगदाड पडले होते.इस्रायली स्नायपर्स छतांवर तैनात असल्याचे आणि लष्कराचे बुलडोझर रस्ते व पायाभूत सुविधांचे नुकसान करत असल्याचे ‘वाफा’ या अधिकृत पॅलेस्टिनी वृत्तसंस्थेने सांगितले.