रशियातील पर्म शहरातील विद्यापीठात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात सोमवारी सकाळी आठ जण ठार झाले तर इतर काही जण जखमी झाले आहेत, असे रशियाच्या तपास समितीने म्हटले आहे.

 बंदूकधाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे. पर्म स्टेट युनिव्हर्सिटीच्या माध्यम सेवेने म्हटले आहे की, गोळीबार करणाऱ्यांकडे प्रगत स्वरूपाच्या बंदुका होत्या. या बंदुका रबर किंवा प्लास्टिकच्या गोळ्यांसाठी वापरल्या जातात पण त्यांचे रुपांतर वेगळ्या उपयोगासाठी करता येते. विद्यापीठाचे विद्यार्थी व कर्मचारी यांनी खोल्यांमध्ये स्वत:ला बंद करून घेतले. जे कुणी आवार सोडून जाऊ शकत होते त्यांना तसे आवाहन करण्यात आले. तास या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, काही विद्यार्थ्यांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या. नेमके किती जण जखमी झाले हे समजू शकलेले नाही. अनिधकृत माहितीनुसार या हल्ल्यात ६ ते १४ जण जखमी झाले आहेत. पण खिडकीतून उड्या मारल्याने ते जखमी झाले किंवा काय हे समजू शकलेले नाही. पर्म हे ठिकाण मॉस्कोपासून पूर्वेला ११०० कि.मी अंतरावर असून लोकसंख्या १० लाख आहे. विद्यापीठात एकूण बारा हजार विद्यार्थी आहेत. बंदूकधाऱ्यांची ओळख पटलेली नाही. त्यांचा गोळीबार करण्यामागील हेतूही समजलेला नाही. मे महिन्यात अशाच प्रकारे कझान येथे गोळीबार झाला होता त्यात सात विद्यार्थी व दोन शिक्षक ठार झाले होते.