धक्कादायक : दिल्लीत ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू

बत्रा हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटरमधील घटना

संग्रहीत

देशात सध्या करोना संसर्गाचा उद्रेक होताना दिसत आहे. दररोज लाखांच्या संख्येत कोरनाबाधित वाढत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, औषध तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी रूग्णांचे हाल सुरू आहेत. अनेक ठिकाणी रूग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रूग्णांच्या मृत्यूच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडल्याचं समोर आलं आहे, येथील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात बत्रा हास्पिटलकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे की, ”रूग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून, तासभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. आमच्याकडे दुपारी १२ वाजता ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर आम्हाला दीड वाजता ऑक्सिजन मिळाला. परिणामी आम्ही आमच्या एका डॉक्टरसह रूग्णांचा मृत्यू झाला.”

तर, यावर उच्च न्यायालायने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत आज ४९० मेट्रीक टन ऑक्सिजन पोहचली पाहिजे. जर याचे पालन केले गेले नाही तर न्यायलय अवमाननाची कारवाई करू शकते. जर हे काम पूर्ण झाले नाही तर डीपीआयटीच्या सचिवास पुढील सुनावणीत न्यायालयासमोर हजर व्हावं लागेल.

करोना संकट काळात दिल्लीतील रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. उच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान दिल्लीतील बत्रा हॉस्टिपलकडून  हे देखील सांगण्यात आले की, ”त्यांच्याकडे अत्यंत कमी प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे. आम्ही दररोज काही तासत संकटात घालवत आहोत, हे चक्र थांबतच नाही. आम्ही एका व्हॉट्स अप ग्रुपवर देखील ऑक्सिजनसाठी विनंती केली, जो कालच ऑक्सिजन पुरवठादार, दिल्ली सरकारमधील अधिकारी आणि रूग्णालयांच्या प्रतनिधींन मिळून बनवला आहे. त्यावर आम्हाला प्रतिसाद मिळाला की, आम्हाला आता ‘डिस्टर्ब’ करू नका.”

प्राणवायूच्या काळजीपूर्वक वापराची गरज

दरम्यान, राज्यांनी उपलब्ध प्राणवायू हा महत्त्वाची बाब म्हणून काळजीपूर्वक उपलब्ध करावा. खासगी व सरकारी रुग्णालयांच्या प्राणवायू वापराचे लेखा परीक्षण करावे, अशी सूचना केंद्राने राज्यांना केली आहे. प्राणवायूचा देशात तुटवडा असताना तो महत्त्वाची बाब म्हणून वापरण्याची व त्यात  जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eight patients including a doctor die in delhi due to lack of oxygen msr

ताज्या बातम्या