रॅगिंग केल्याच्या आरोपावरून येथील सत्यजित रे फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमधील (एसआरएफटीआय) आठ विद्यार्थ्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच ससदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
सदर संस्थेच्या मंडळाचे अध्यक्ष दीपांकर डे यांनी सांगितले की, आठ विद्यार्थ्यांना रॅिगगच्या आरोपावरून निलंबित करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालकांनी आपल्याला दिली. रॅगिंग बेकायदेशीर असल्याने त्यांच्या कारवाईला आपण समर्थन दिले आहे, असे डे यांनी सांगितले.
संस्थेतील दोन विद्यार्थिनींनी आपल्याकडे ज्येष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंग केले जात असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे संस्थेचे रजिस्ट्रार दीपांकर मुखर्जी यांनी सांगितले.
चौकशी समितीला शक्य तितक्या लवकर आपला अहवाल देण्यास सांगण्यात आले असून त्यानंतर या विद्यार्थ्यांवर पुढील कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे डे यांनी सांगितले.