एपी, मेक्सिको शहर : मेक्सिको शहरात मंगळवारी आठ तरुण कामगारांचे मृतदेह सापडले. हे कामगार एका वादग्रस्त अमली पदार्थ व्यापाऱ्याद्वारे संचालित ‘कॉल सेंटर’मध्ये कामाला होते. हे कॉल सेंटर विशेष करून अमेरिकी नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होते. या कामगारांनी तेथील नोकरी सोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते.
अमेरिकन आणि मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी या कामगारांची हत्या झाली असावी याला पुष्टी दिली. ते काम करत असलेल्या कॉल सेंटरचे कार्यालय मेक्सिकोच्या पश्चिमेकडील ग्वाडालजारा शहराजवळ आहे. गेल्या महिन्यात हे कामगार कामावरून परत आल्यानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातलगांनी केली होती. त्यानुसार २० मे ते २२ मे दरम्यान एकूण सहा पुरुष आणि दोन महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. गेल्या आठवडय़ात प्लास्टिक पिशव्यांत या तरुणांच्या मृतदेहांचे अवयव आढळल्याने संशय बळावला. तज्ज्ञांनी सोमवारी एका निवेदनात नमूद केले, की चाचण्यांत हे मृतदेह कॉल सेंटरच्या कामगारांचे असल्याची पुष्टी झाली आहे. पण नेमके किती कामगारांचे हे अवयव आहेत, याचा तपशील या तज्ज्ञांनी दिला नाही.



