प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन यांनी त्यांच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांला १९३८ मध्ये लिहिलेल्या दोन पत्रांना लिलावात ४ लाख डॉलर इतकी विक्रमी किंमत येण्याची शक्यता आहे. या पत्रात आईनस्टाइनने हर्बर्ट इ साल्झर या पदवीच्या विद्यार्थ्यांने दाखवून दिलेली गणिती चूक खुल्या मनाने मान्य केली आहे.
 त्यावेळी अवघ्या २३ वर्षे वय असलेल्या सालझर याने कोलंबिया विद्यापीठातून पीएच डी केली होती. तेव्हा त्याने ऑगस्ट १९३८ मध्ये आईनस्टाइनला पत्र पाठवून त्याच्या डिस्टंट पॅरेलेलिझम फील्ड सिद्धांतातील गणिती चूक दाखवून दिली होती. गुरुत्वाकर्षण व विद्युत चुंबकीय क्षेत्र याबाबत असलेला  संयुक्त क्षेत्र सिद्धांत (युनिफाइड थिअरी ) मांडताना आईनस्टाइनने १९३१ च्या सुमारास त्यावरील संशोधन सोडून दिले होते. आईनस्टाइनने साल्झर या विद्यार्थ्यांला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते की, तुम्ही गणितीय आकडेमोडीतील जी चूक मला दाखवून दिली त्यामुळेच आपले काम थांबले होते. त्यानंतर दोन आठवडय़ांनी पाठवलेल्या पत्रात आईनस्टाइनने असे म्हटले होते की, तुमचे रूपांतरण समीकरण चुकीचे आहे. नंतर आईनस्टाइनने रूपांतरण समीकरण बरोबर असल्याचे मान्य करून आणखी खुल्या दिलाने चूक मान्य केली होती.
 साल्झरच्या पत्राने आईनस्टाइनने त्यांचे संशोधन परत तपासले, क्षेत्रीय समीकरणाविषयी स्वीकारार्ह संचाबाबतचे संशोधन पुन्हा सुरू केले व नंतर डिस्टंट पॅरेलेलिझम बाबतचा संयुक्त सिद्धांत समर्थनाशी मांडला.
 साल्झरने आईनस्टाइनला एकदाच पत्र लिहिले होते, पण आईनस्टाइनने त्याला दोन पत्रे पाठवली. पहिले पत्र २९ ऑगस्ट १९३८ चे आहे व ते दोन्ही बाजूने लिहिलेले आहे त्यात आईनस्टाइनने साल्झरला तुम्ही जे भौतिकीय सादरीकरण केले आहे त्याच्याशी संबंधित गणने चुकीची नाहीत त्यात आईनस्टाइन असे म्हणतो की, जे साल्झरने सुचवले आहे ते शक्य नाही. या प्रतिसादानंतर आईनस्टाइनने १३ सप्टेंबर १९३८ रोजी साल्झरला दुसरे पत्र ब्रुकलिनच्या पत्त्यावर पाठवले त्यात मॉर्टन कॉटेज, नसाऊ पॉइंट पेकोनिक एआयएनवाय असा पूर्ण पत्ता आहे. त्यावर तीन सेंटचे जॉर्ज वॉशिंग्टनचे चित्र असलेले तिकीट आहे. दुसरे पत्र दोन्ही बाजूंनी लिहिले असून ते १३ सप्टेंबर १९३८ रोजीचे आहे. त्यातील मजकुरात साल्झरने सुचवल्याप्रमाणे पुन्हा संशोधन तपासून पाहिल्याचे म्हटले असून आईनस्टाइनने त्यात साल्झरचे म्हणणे खरे असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही पत्रांचा लिलाव ७ नोव्हेंबरला न्यूयॉर्कमधील गर्नसेच्या लिलावगृहात होणार असून त्यांना ४ लाख अमेरिकी डॉलर इतकी किंमत येण्याची शक्यता आहे.
नंतर साल्झर हा गणितज्ञ, वैज्ञानिक व संशोधक बनला, नंतर तो वॉशिंग्टन अ‍ॅव्हेन्यू येथे स्थायिक झाला होता व नंतर २००६ मध्ये साल्झरचे निधन झाले होते.