आगामी लोकसभा निवडणुकीवर एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले, "महाविकास आघाडीने ४ किंवा ६ जागा..." | eknath shinde comment on upcoming 2024 general election and mahavikas aghadi | Loksatta

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले, “महाविकास आघाडीने ४ किंवा ६ जागा…”

आगामी लोकसभा निवडणुकीला साधारण दीड वर्षे बाकी आहेत. ही निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

EKNATH SHINDE AND GENERAL ELECTION 2024
एकनाथ शिंदे आणि लोकसभा निवडणूक (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आगामी लोकसभा निवडणुकीला साधारण दीड वर्षे बाकी आहेत. ही निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या पक्षांकडून आतापासूनच प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, एकीकडे सर्व पक्ष निवडणुकीची तयारी करत असताना दुसरीकडे ‘इंडिया टुडे’ने ‘सी-वोटर’बरोबर ‘मूड ऑफ द नेशन’ सर्व्हे केला असून या सर्व्हेमध्ये सध्या लोकसभेची निवडणू झाली तर भाजपाच्या जागा कमी होतील ,असे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसे आहे, असे शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा >> पंढरपूर वगळता पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीचाच वरचष्मा

आघाडी होणार आहे असे गृहित धरून निकालाचे अंदाज बांधने म्हणजे दिशाभूल

“गेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जे यश भाजपा आणि शिंदे गटाला मिळाले, त्याची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवली असती तर अंदाजाला खरा आधार मिळाला असता. आगामी महापालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुका होतील, या निवडणुकीचा निकालाचा सर्व्हे हा सर्वांत मोठा असेल. जे आकडे समोर आले आहेत, ते आता निवडणुका झाल्या तर या गृहितकावर आधारित आहेत. मात्र दीड वर्षांनी निवडणुका होणार आहेत. आघाडी होणार आहे असे गृहित धरून निकालाचे अंदाज बांधने म्हणजे दिशाभूल आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> नेपाळच्या पवित्र नदीतल्या शाळिग्राम शिळेत कोरले जाणार भगवान श्रीराम, जनकपूरवरून येणार धनुष्य

मागील अडीच वर्षात कामच झाले नाही

“महाविकास आघाडीने मागील लोकसभेच्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकलेल्या आहेत, आगामी निवडणुकीत तेवढ्यादेखील जागा महाविकास आघाडीला राखता येणार नाहीत. या राज्यामध्ये जे काम आम्ही करतोय, ते पाहून लोक खूश आहेत. लोक सुज्ञ आहेत. मागील अडीच वर्षात कामच झाले नाही. काम न करणाऱ्यांना लोक पसंदी देतील की काम करणाऱ्यांना लोकांना लोक निवडतील हे सर्वांनाच ठाऊक आहे,” अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

आधीच्या निवडणुकीतील सर्व विक्रम मोडीत निघतील

“त्यांच्या छातीत धडकी बसली आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत म्हणूनच हे खटाटोप काही पक्ष करत आहेत. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे. ते लोकप्रिय आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आधीच्या निवडणुकीतील सर्व विक्रम मोडीत निघतील. मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला मोठे यश मिळेल. महाराष्ट्रातही आम्हाला मोठे यश मिळेल. त्यांनी लोकसभेच्या ४ ते ६ जागा राखल्या तरी खूप मोठी बाब होईल,” असेही शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोणाची येणार सत्ता? जनतेचा पाठिंबा नेमका कोणाला? जाणून घ्या

… तर त्यांनी तो आनंद जरूर घ्यावा

“आकडेवारीला खूप महत्त्व असते. सध्याच्या ओपिनयन पोलमुळे कोणाला हर्षवायू झालेला असेल तर त्यांनी तो आनंद जरूर घ्यावा. त्यांचा आनंद मला हिरावून घ्यायचा नाही. आम्ही दीड वर्षे काम करत राहू. तुम्ही दीड वर्षे या ओपिनियन पोलचा आनंद घ्या,” असा टोला शिंदे यांनी लगावला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:04 IST
Next Story
संभाजीराजेंनी घेतली तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट; काय झाली चर्चा? जाणून घ्या