नवी दिल्ली : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून मंगळवारी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. शिंदेंनी अचानक सोमवारी रात्री दिल्लीत दाखल होत थेट मोदींशी भेट घेतल्यामुळे दिवसभर राजकीय तर्कवितर्क केले जात होते. मात्र, राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात मोदींशी चर्चा केल्याचे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या वेगवान राजकीय घडामोडी तसेच, स्थानिक स्वराज्य संस्था व राज्यसभेच्या निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. त्याबाबत, मोदींबरोबर प्रदीर्घ व सकारात्मक बैठक झाल्याचे सांगतानाच, शिंदे यांनी, दिल्लीत आल्यावर माझ्यावर कोणी टीका केली तरी, मला हवे ते मी करत असतो, अशी चपराक विरोधकांना लगावली.
शिवसेनेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटलाही शिंदे गटासाठी तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हासंदर्भात अंतिम सुनावणी लवकरच होणार आहे. त्या दृष्टीनेही शिंदेच्या दिल्लीवारीकडे पाहिले जात आहे. यासंदर्भात शिंदे यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
शिंदे सोमवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार होते पण, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शिंदेची शहांबरोबर चर्चा झाली नाही. संसदेमध्ये मंगळवारी देखील शहा विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातील पक्षाच्या बैठकीत व्यग्र होते. त्यांच्या भेटीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे समजते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही शिंदे यांनी संसदेच्या त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली.
राज्यसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाने अतिरिक्त उमेदवार रिंगणात न उतरवता शरद पवार यांना मदत केली होती. तशीच मदत विधान परिषदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनाही करणार का, या प्रश्नावर, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू, असे म्हणत शिंदेंनी या प्रश्नाला बगल दिली.
खासदारांची खरडपट्टी
पक्षाच्या काही खासदारांच्या कामगिरीबद्दल शिंदेंनी सोमवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रातील मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलामध्ये स्थान मिळवण्यासाठी काही खासदारांची धडपड सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या खासदारांना शिंदेंनी चपराक दिल्याचे समजते. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, असे शिंदेंनी खासदारांना ठणकावले.
तुम्ही दिल्लीत असलात करी, माझे तुमच्या कामावर लक्ष आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्यांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड तयार केले जात आहे, अशी समज शिंदेंनी खासदारांना दिल्याचे कळते.
संसदेचे अधिवेशन सुरू असते तेव्हा मी नेहमी दिल्लीत येत असतो. इथे माझ्या पक्षाचे खासदार आहेत, त्यांच्याशीही मी सविस्तर चर्चा केली. – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री.
