एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर दिल्लीत घडामोडींना वेग; अमित शाह-जे.पी. नड्डांची तातडीची बैठक! | eknath shinde not reachable devendra fadnavis in delhi amit shah j p nadda meeting | Loksatta

एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर दिल्लीत घडामोडींना वेग; अमित शाह-जे.पी. नड्डांची तातडीची बैठक!

राज्यात एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.

एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर दिल्लीत घडामोडींना वेग; अमित शाह-जे.पी. नड्डांची तातडीची बैठक!
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर दिल्लीत घडामोडींना वेग (संग्रहीत छायाचित्र)

राज्य सरकारमध्ये मंत्री आणि शिवसेनेतील महत्त्वाचे नेते असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या रुपाने शिवसेनेत मोठी बंडखोरी होणार असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असतानाच शिवसेनेचे अनेक आमदार त्यांच्यासोबत असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमवीर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार की काय? अशी शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. सकाळी राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची तातडीची बैठक झाली असताना दुसरीकडे राज्यातील भाजपाचे महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील दिल्लीला रवाना झाले आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

सोमवारी लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मतं फुटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळू लागले होते. त्यात आज सकाळपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार नॉट रीचेबल झाल्यामुळे राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

“ऊन-सावल्यांचा खेळ हा निसर्गाचा नियमच”, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर काँग्रेसकडून सूचक प्रतिक्रिया!

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत दाखल झाल्यामुळे दिल्लीतही राज्यातील घडामोडींचे पडसाद उमटू लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. फडणवीसांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. या भेटीमध्ये राज्यातील घडामोडींवर चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावरून भाजपाची भूमिका काय असावी? यासंदर्भात देखील सल्लामसलत झाल्याची चर्चा आहे.

एकीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र, देवेंद्र फडणवीस भाजपाच्या नेहमीच्या पद्धतीनुसारच दिल्लीत गेल्याचं सांगितलं आहे. “निवडणूक जिंकल्यानंतर वरीष्ठ नेत्यांना मिठाई देण्याची भाजपाची पद्धत आहे. त्यासाठीच देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, अमित शाह यांनी काही वेळापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची तातडीने भेट घेतल्यामुळे त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना त्यांच्या भेटीनंतर अचानक अमित शाह आणि नड्डा यांची भेट झाल्यामुळे त्या भेटीला राज्यातील राजकीय घडामोडीच कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.

Eknath Shinde Live Updates : “शिवसेनेची तीन नाही, तर १२ मतं फुटली”, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा दावा; वाचा प्रत्येक अपडेट…

दुसरीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यास त्यांच्यासोबत नेमके शिवसेनेचे किती आमदार जाणार आणि त्यानंतर महाविकास आघाडीला सरकार टिकवण्यासाठी कोणती कसरत करावी लागणार? याविषयी राजकीय विश्लेषकांमध्ये तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. यासंदर्भात शिवसेना आमदार संजय राठोड यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता ते पुन्हा सूरतला जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा? सूचक ट्वीट करत म्हणाले…

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘समृद्धी महामार्गावरून’ एकत्र प्रवास केलेली गाडी कोणाची? काँग्रेसचा खळबळजनक आरोप; म्हणाले…
VIDEO: “संजय राऊतांच्या तोंडात त्यांच्या आईने…”, आमदार गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Hijab Ban: इराणमधल्या महिलांच्या हिजाब सक्तीविरोधातील संघर्षाला यश; ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’चा गाशा गुंडाळला
“मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास…”, गुलाबराव पाटील संतप्त
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी