नवी दिल्ली : पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेने मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली असून, त्यांना पक्षाचा ‘एबी फॉर्म’ही देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महायुतीतील जागावाटपाबाबत माघारीच्या मुदतीपर्यंत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सांगितले.

शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मंगळवारी किंवा बुधवारपासून राज्यात येणार आहे. या पथकाकडून नुकसानीची पाहणी आणि पंचनामे केले जातील. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सरकार एकत्रितपणे काम करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मोदींशी महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘शेतकरी संकटात असल्याने केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे,’ असे पंतप्रधानांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

ठाकरेंवर टीका

महाराष्ट्रातील जनतेने ज्या लोकांना निवडणुकीत गाडून टाकले तेच गाडण्याची भाषा करतात, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केली. पंतप्रधानांचा मान राखलाच पाहिजे. पण, त्यांच्यावर आरोप केले की हेडलाइन होते, हे खालच्या पातळीवरचे राजकारण लोकांना पटत नाही, असे ते म्हणाले.