२२ जून पासून महाराष्ट्रातील राजकीय हलचालींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आसामच्या राजधानीमधील म्हणजेच गुवहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन ब्लू’बाहेर शिवसेनेचे बंडखोर आमदार विरुद्ध विरोधक अशी बॅनरबाजी सुरु झाली आहे. काल म्हणजेच २७ जून २०२२ रोजी या हॉटेलबाहेरील एका मोठ्या होर्डींगवर बंडखोरांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंसहीतचे होर्डींग झळत होते. मात्र आज हे हॉटेल असणाऱ्या राजधानीच्या शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नावाने फिल्मी स्टाइल बॅनर झळकावत बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आलीय.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ‘रेडिसन ब्लू’ हॉटेल ज्या परिसरामध्ये तिथेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बॅनरबाजीमधून बंडखोर शिवसेना आमदारांना लक्ष्य केलंय. या हॉटेलबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर बाहुबली या गाजलेल्या चित्रपटामधील एका सीनमधील दृष्य दिसत आहे. कटप्पाने बाहुबलीवर पाठीमागून वार केल्याचं दृष्य पोस्टवर दिसत असून त्याच्या बाजूला गद्दार असा हॅशटॅग लिहिण्यात आलाय.

नक्की वाचा >> मुंबईतील इमारत दुर्घटना: एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार स्थानिक बंडखोर आमदाराने थेट गुवाहाटीतून जाहीर केली मोठी आर्थिक मदत

या बॅनर तळाशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं नाव आहे. तर पोस्टवर वरच्या भागामध्ये, “संपूर्ण देश पाहतोय, गुवाहाटीमध्ये लपलेल्या गद्दारांकडे. अशा खोट्या लोकांना जनता माफ करणार नाही,” अशा अर्थाच्या ओळी लिहिण्यात आल्यात. “सारा देश देख राहा है, गुवाहाटी में छुपे गद्दारोको, माफी नही करेगी जनता, ऐसे फर्जी मक्कारो को”, या ओळी या बॅनरवर आहेत.

नक्की वाचा >> “शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी, ते हिंदूत्वही मानत नाहीत कारण, कारण तसं असतं तर…”

दरम्यान, कालच या हॉटेलसमोर शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ होर्डींग झळकावण्यात आले होते. मात्र हे होर्डींग आज काढून टाकण्यात आले आहेत.

नक्की वाचा >> “पूरग्रस्त गुवाहाटीत लोकांना अन्न मिळत नसताना बंडखोर आमदारांचा दिवसाचा जेवणाचा खर्च…”; आदित्य ठाकरेंनी सांगितला बिलाचा आकडा

बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत वास्तव्यास असणाऱ्या या पंचातारांकित हॉटेलमधील मुक्काम पाच जुलैपर्यंत वाढल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायलायने एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना या याचिकेवर १२ जुलै रोजी सुनावणी घेणार असल्याचं २७ जून च्या सुनावणीदरम्यान सांगितलं आहे. त्यामुळे आता हे बंडखोर आमदार १२ जुलैपर्यंत येथेच थांबतात की अन्य ठिकाणी जाणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.