झिका विषाणूच्या प्रसारास वाढते तापमान खूपच पोषक असल्याचे निष्पन्न झाले आहे, एडिस एजिप्ती या डासामुळे या विषाणूचा फैलाव होतो, त्याच डासामुळे डेंग्यू व चिकुनगुन्या, पीतज्वर या रोगांचा प्रसार होतो. डासांमुळे माणसाला अनेक रोग होतात त्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणे आवश्यक असते. एल निनो परिणामामुळे अनेक ठिकाणी तापमान वाढून डासांची उत्पत्ती वाढली. परिणामी झिका विषाणूचा प्रसारही वाढला असा वैज्ञानिकांचा दावा आहे.
पूर्वीही झिका विषाणूचे काही रुग्ण होते पण त्याचे गांभीर्य फार मोठे नव्हते. अलीकडे हवामान बदलांमुळे या विषाणूचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला असून त्यामुळे अर्थव्यवस्था, प्रवास, वातानुकूलन यंत्रणा, डास या घटकांचा या रोगाशी संबंध आहे आता त्यात एल निनोची भर पडली आहे. एल निनो या प्रशांत महासागरातील सागरी जलतापमानवाढीच्या कारणास्तव जगात अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. वैज्ञानिकांच्या मते तुम्ही झिकाच्या प्रसारास केवळ एक कारण देऊ शकत नाही. त्यामुळे झिकाचा संबंध एल निनो परिणामाशी जोडणे जरा घाईचे होईल. तापमान वाढते त्याप्रमाणे एडिस एजिप्ती या डासाची पैदासही वाढते त्यामुळे झिकाच नव्हे, तर डेंग्यू व इतर रोगांचा प्रसार वाढतो असे डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ बिल रिनसेन यांनी सांगितले.
तापमानवाढीने डास वाढतात व त्यामुळे रोगाचा संसर्ग वाढतो, त्यानंतर विषाणूंची संख्या वाढत जाते व डास ते फार आधीच माणसापर्यंत पोहोचतात. डासांची उष्मागतिकी ही तापमानावर अवलंबून असते. झिका पसरणारी ठिकाणे ही जास्त तापमानाची व दुष्काळी आहेत. ब्राझीलमधील रिसायइफ हे मोठे शहर झिकाग्रस्त असून तेथे सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात सरासरीपेक्षा १.२ अंश सेल्सियस जास्त तापमान होते, असे नासाच्या आकडेवारीत दिसून आले आहे. पेर्नामब्युको येथे उष्ण व कोरडी वर्षे १९९८ पासून येत आहेत, गेले वर्ष सर्वात उष्ण होते. झिका विषाणूचा वैज्ञानिकांनी फार कमी अभ्यास केला आहे, तुलनेने डेंग्यू व चिकुनगुन्याचा जास्त अभ्यास झाला आहे. जगात दरवर्षी ४० कोटी लोकांना डेंग्यू होतो व त्यांना काही वेळा रुग्णालयात दाखल करावे लागते. झिका ही अलीकडेच आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे. साधारणपणे डास जास्त जगत नाहीत त्यांचे आयुष्य सरासरी १०-१२ दिवस असते. डासाच्या आतडय़ात विषाणू जाऊन त्या रोगाचा नंतर माणसात प्रादुर्भाव होण्यास वेळ लागतो त्यापूर्वीच डास रोगाचा प्रसार करण्यापूर्वीच मरतो, असे डेव्हिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे टॉम स्कॉट यांनी सांगितले. उष्ण हवेत थंड रक्ताच्या डासांमध्ये विषाणूची वाढ लवकर होते व तो रोग पसरवतो. उष्ण तापमानाने डासांची भूक वाढते त्यामुळे ते रक्त पीत सुटतात. तसेच गरम हवेने डासांची उत्पत्तीही वाढते. वॉशिंग्टन विद्यापीठातील क्रिस्टी एबी यांच्या मते एल निनोमुळे ईशान्य ब्राझीलमध्ये दुष्काळ पडतो, गेल्या वर्षीही दुष्काळ पडला होता. नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रीसर्च या संस्थेचे अँडी मोनघन यांनी सांगितले की, डासांमधून विषाणू पसरतात त्याला हवामान हे एक कारण आहे. अमेरिकन हवामान संस्थेच्या वार्षिक मेळाव्यात त्यांनी एक शोधनिबंध सादर केला होता. त्यात अमेरिकेत जागतिक तापमानवाढीने डास वाढतात व अमेरिकेतील मिसुरी, टेनिसी, केंटुकी, उत्तर कॅरोलिना, व्हर्जिनिया या राज्यात हा परिणाम दिसून येतो असे म्हटले होते.
झिकाच्या प्रसारास एल निनोही कारणीभूत
झिका विषाणूच्या प्रसारास वाढते तापमान खूपच पोषक असल्याचे निष्पन्न झाले आहे
First published on: 05-02-2016 at 00:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: El nino responsible for zika virus