पीटीआय, नवी दिल्ली : जून ते ऑगस्ट या कालावधीत वेगवेगळय़ा तारखांना निवृत्त होणाऱ्या सदस्यांमुळे रिक्त होणार असलेल्या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५७ जागा भरण्याकरिता १० जूनला निवडणूक घेतली जाईल, असे निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले.  निवृत्त होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, काँग्रेसचे नेते अंबिका सोनी, जयराम रमेश व कपिल सिबल आणि बसपचे सतीशचंद्र मिश्रा यांचा समावेश आहे. सदस्य २१ जून ते १ ऑगस्टदरम्यान निवृत्त होणार आहेत.

 उत्तर प्रदेशातील ११ जागा रिक्त होणार असून, तमिळनाडू व महाराष्ट्रातील प्रत्येकी सहा, बिहारमधील पाच, तर आंध्र प्रदेश, राजस्थान व कर्नाटकमधील प्रत्येकी ४ सदस्य निवृत्त होणार आहेत. याशिवाय मध्य प्रदेश व ओडिशातील प्रत्येकी तीन, तेलंगण, छत्तीसगड, पंजाब, झारखंड व हरियाणातील प्रत्येकी दोन आणि उत्तराखंडमधील एका सदस्याचा निवृत्त होणार असलेल्यांमध्ये समावेश आहे.  या निवडणुकीची अधिसूचना २४ मे रोजी जारी केली जाणार असून, मतदान १० जूनला घेतले जाईल. प्रचलित पद्धतीनुसार, मतदान संपल्यानंतर एका तासाने मतमोजणी सुरू केली जाईल.