नवी दिल्ली : अंतर्गत मतभेद आणि भिन्न निरीक्षणे ही कोणत्याही बहुसदस्यीय संस्थेतील नियमित निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी निवेदनाद्वारे दिले. केंद्रीय निवडणूक आयोगातील अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी विविध निर्णयांवर तीव्र आक्षेप घेतल्याचे सविस्तर वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले. या वृत्ताचे केंद्रीय निवडणूक आयोगाने खंडन केलेले नाही. उलट, मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयप्रक्रियेला अन्य दोन केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी लेखी विरोध केल्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिल्याचे आयोगाच्या निवेदनावरून स्पष्ट होते.
केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत नोंदी वा निरीक्षणांपैकी काही निवडक बाबी समोर आणल्याने संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही, असा दावाही आयोगाने निवेदनाद्वारे केला. मात्र, या निवेदनामध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’चा उल्लेख आयोगाने टाळला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानंतर विरोधी पक्षांनी मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात बुधवारी टिकेची झोड उठवली. त्यावर सुरुवातीला, आयोगाच्या वतीने सूत्रांच्या आधारे, आयोगाचे निर्णय सहमतीने घेतले गेल्याचा दावा केला गेला होता. मात्र, नंतर आयोगाच्या वतीने संपूर्ण प्रकरणावर अधिकृतपणे निवेदन प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट करण्यात आली.
केंद्रीय निवडणूक आयोग ही राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२४अंतर्गत कार्य करणारी बहुसदस्यीय घटनात्मक संस्था आहे. आयोगाच्या सदस्यांकडून मसुद्याच्या स्तरावर मांडण्यात येणाऱ्या सूचना, तांत्रिक निरीक्षणे, लेखी नोंदी आणि प्रशासकीय प्रश्न हे संस्थेतील अंतर्गत तपासणी व समतोल राखण्याच्या प्रक्रियेचाच भाग आहेत. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी वेगवेगळी मते मांडली जाणे स्वाभाविक आहे, असे आयोगाच्या निवेदनात नमूद केले आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी, गेल्या दहा महिन्यांत मतदारांची नावे समाविष्ट करणे, तसेच वगळणे, मतदारयाद्यांमधील फेरबदल आणि निवडणूक आयोगाच्या डिजिटल प्रणालीच्या कार्यपद्धतीसह विविध मुद्द्यांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवले आहेत. त्यांनी हे आक्षेप लेखी स्वरुपात मांडले आहेत. त्यांनी केंद्रीय सचिवांकडेही हे आक्षेप नोंदवले आहेत. विशेषतः नव्या मतदारांच्या नोंदणीसाठीच्या ‘फॉर्म-६’मध्ये करण्यात आलेल्या बदलावर दोन्ही आयुक्तांनी आक्षेप घेतले होते.
या बदलासाठी निवडणूक नोंदणी नियमांमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते. ‘फॉर्म-६’मधील बदल ‘अनधिकृत’ असल्याचा आक्षेप नोंदवत तो तातडीने मागे घेण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, या आक्षेपांबाबत आयोगाने, अंतर्गत नोंदींचा अर्थ अंतिम निर्णयांशी जोडू नये, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
आयोगातील केवळ तीन आयुक्तच नव्हे, तर प्रत्येक अधिकाऱ्याला निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सूचना मांडण्याचा अधिकार आहे. वेगवेगळ्या सूचना आणि निरीक्षणे ही अंतिम निर्णयापूर्वीची विचारविनिमय प्रक्रिया आहे. – निवडणूक आयोग
‘संपूर्ण चित्र पाहणे आवश्यक’
गेल्या दहा महिन्यांतील काही निवडक अंतर्गत नोंदींवर भर देताना आयोगाने या कालावधीत घेतलेल्या इतर निर्णयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा केला. आयोगाच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात पूर्ण आयोगाने एकमताने अनेक निर्णय घेतले असून सुमारे ४० नवे उपक्रम आणि विविध निवडणूक सुधारणा केल्या आहेत. यामध्ये देशभरातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेचाही (एसआयआर) समावेश आहे. बिहार, केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडल्याचेही आयोगाने नमूद केले. या निवडणुकांसाठी मोठ्या प्रशासकीय यंत्रणेचे संचालन, विविध पातळ्यांवरील मंजुरी आणि आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली, असेही म्हटले आहे.
‘डिजिटल प्रणाली सुरक्षित’
‘ईसीआयनेट’सह आयोगाच्या डिजिटल व्यासपीठांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवरही आयोगाने भूमिका स्पष्ट केली. या प्रणाली अनधिकृत हस्तक्षेप, फेरफार किंवा छेडछाड रोखण्यासाठी कठोर माहिती-सुरक्षा प्रोटोकॉलअंतर्गत चालवल्या जात आहेत. राष्ट्रीय पातळीवरील डिजिटल डेटाबेससाठी नियमित आयटी सुरक्षा तपासण्या आणि लेखापरीक्षण व्यवस्था असणे ही प्रमाणित सायबर सुरक्षा प्रक्रिया असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.
‘ईसीआयनेट’चा वापर मर्यादित केल्याच्या मुद्द्यावरही अन्य दोन आयुक्तांनी आक्षेप घेतला होता. मतदारांची नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे यासंबंधीची वैधानिक जबाबदारी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या अन्य अहवालात ‘ईसीआयनेट’च्या केंद्रीकृत व्यवस्थेबाबत दोन निवडणूक आयुक्तांनी प्रश्न उपस्थित केल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही प्रकरणांत स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांच्या निर्णयांची डिजिटल प्रणालीवर नोंद करण्यास अडचणी आल्याचे वृत्तात स्पष्टपणे नमूद केले होते. घटनात्मक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्यास आयोग कटिबद्ध असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
