निवडणूक आयोग पक्षाच्या नियंत्रणाखाली असल्याचे वक्तव्य पश्चिम बंगालमधील भाजप नेत्याने केल्याच्या प्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना येत्या शुक्रवापर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
आपल्या पक्षाचे निवडणूक आयोगावर नियंत्रण आहे, असे वक्तव्य भाजपचे नेते जॉय बॅनर्जी यांनी बिरभूम येथील जाहीर सभेत २० सप्टेंबर रोजी केले होते, त्याचा संदर्भ देऊन निवडणूक आयोगाने शहा यांना पत्र पाठविले आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असून त्यासाठीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही त्यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ पत्रात देण्यात आला आहे.
बॅनर्जी यांच्या वक्तव्यामुळे आयोगाच्या तटस्थतेबद्दल, स्वायत्ततेबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे भाजपने बॅनर्जी यांच्या वक्तव्याबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, असे आयोगाने म्हटले आहे.