वादग्रस्त घोषणेमुळे अनुराग ठाकूर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत खुलासा करण्याची मुदत

भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे वादग्रस्त घोषणेमुळे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अनुराग ठाकूर व भाजपा खासदार परवेश वर्मा यांच्याकडून आचार संहितेचा भंग झाल्याप्रकरणी अहवाल सादर केला आहे. यानंतर या दोघांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांना खुलासा करण्याची मुदत देण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाही सुरू आहे. भाजपा उमेदवाच्या प्रचारासाठी सोमवारी झालेल्या सभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर वादग्रस्त घोषणांमुळे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी दिल्लीच्या निवडणूक कार्यालयाने त्यांच्या वादग्रस्त घोषणेची दखल घेत त्या संदर्भात अहवाल मागवला होता.

राजधानी दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजपा व काँग्रेस या तीन पक्षात मुख्य लढत असून, तिन्ही पक्षांनी दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी प्रचारात झोकून दिल्याचं चित्र सध्या आहे. भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती. रिठला विधानसभा क्षेत्रात झालेल्या या सभेत भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारों को..’ अशी घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो *** को’ अशी घोषणाबाजी केली होती. रिठाला विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Election commission issues notice to union minister anurag thakur msr