भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने सन्मानित ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सी. एन. आर. राव यांच्या नावे निवडणूक आयोगाने नोटीस जारी केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्नाटकात मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेदरम्यान (SIR) मतदार यादीतील नावातील तफावतीमुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ ‘Prof’ ऐवजी स्पेलिंगमध्ये एक अतिरिक्त अक्षर लागून ‘Proff’ असा उल्लेख झाल्यामुळे ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भातील वृत्त NDTV या वृत्तसंस्थेने दिले आहे.

प्रा. राव यांच्या कार्यालयाची प्रतिक्रिया काय?

या संपूर्ण प्रकरणावर प्रा. राव यांच्या कार्यालयातील प्रतिनिधीने माहिती दिली आहे, “निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ही माहिती ऑनलाईन दिसत आहे. मात्र, आमच्या कार्यालयाला किंवा प्रा. राव यांना प्रत्यक्ष स्वरूपात अथवा ईमेलद्वारे कोणतीही नोटीस मिळालेली नाही. ‘Proff’ या शब्दातील एका अतिरिक्त अक्षराचा अपवाद वगळता मतदार नोंदींमध्ये कोणतीही मोठी चूक नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या नावातील तफावतीच्या दुरुस्तीसाठी प्रा. राव यांना बंगळुरू येथील मल्लेश्वरम परिसरातील निवडणूक कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

याआधी पद्मश्री हरेकाला हजब्बा यांनाही नोटीस

निवडणूक आयोगाच्या या पडताळणी मोहिमेत याआधीही अनेक नामांकित व्यक्तींना अशा प्रकारच्या नोटिसा गेल्या आहेत. संत्रा विक्रेते ते सामाजिक कार्यकर्ते असा प्रवास करत आपल्या गावात शाळा उभारणारे पद्मश्री पुरस्कारविजेते हरेकाला हजब्बा यांनाही मतदार यादीतील नावात बदल असल्याने नोटीस पाठवण्यात आली होती. तथापि, ही तांत्रिक चूक दुरुस्त करून हा मुद्दा सोडवण्यात आल्याचे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

कोण आहेत प्रा. सी. एन. आर. राव?

  • संशोधन क्षेत्र: घन अवस्था रसायनशास्त्र (Solid-State Chemistry), नॅनोमटेरियल्स आणि स्ट्रक्चरल केमिस्ट्रीमध्ये जागतिक दर्जाचे योगदान.
  • संस्थापक: १९७६ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मध्ये सॉलिड स्टेट अँड स्ट्रक्चरल केमिस्ट्री युनिटची स्थापना.
  • नेतृत्व: १९८४ ते १९९४ या काळात ‘IISc’ चे संचालक म्हणून धुरा सांभाळली.
  • प्रकाशने: १,६०० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित; अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित.

कर्नाटकात ४३ लाखांहून अधिक नोटिसा

कर्नाटक निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यभरात सुरू असलेल्या मतदार यादी दुरुस्ती मोहिमेत आतापर्यंत ४३.८१ लाखांपेक्षा जास्त नोटिसा तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी ७.३१ लाख नोटिसा मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. ४ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार कर्नाटकात एकूण ४.४६ कोटींहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत. ज्या मतदारांच्या नावात त्रुटी आहेत किंवा ज्यांच्या नोंदी जुळत नाहीत, त्यांनाच या नोटिसा पाठवल्या जात आहेत.